ठाणे : लोककलेचा भाग असणाऱ्या पारंपरिक लावणी या नृत्याविष्काराच्या माध्यमातून समाज, कलावंतांचे जीवन आणि प्रेमकहाणी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये ‘लव्ह ॲण्ड लावणी’ या कार्यक्रमात रंगली. हिंदी-मराठी गाणी, निवेदन, ढोलकीच्या तालावर ठेका धरत शबाना अष्टुरकर या नामवंत लावणी कलावंताचा जीवनपट या संगीतबारीतून दुमदुमला.
‘संगीतबारी’ या पुस्तकातील संदर्भ वापरून भूषण कोरगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘लव्ह ॲण्ड लावणी’ हा कलाविष्कार शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सादर झाला. पारंपरिक लावणीगीतांना समकालीन दृष्टिकोन देत त्यातील भावना, समाजातील स्त्रियांचे स्थान आणि प्रेमाचे पैलू दाखवणारा हा मंचीय आविष्कार अनुभवण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती. लावणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे माध्यम असल्याची प्रचीती या कार्यक्रमातून आली.
राजहंस प्रकाशनतर्फे भूषण कोरगावकर यांचे ‘संगीतबारी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. बारा वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात लावणीचा सविस्तर इतिहास, त्यात झालेल्या बदलांची माहिती, तसेच कलाकारांचा परिचय या पुस्तकात दिला आहे. याच पुस्तकातील संदर्भ वापरून लावणी या लोककलेच्या नृत्यप्रकाराला देशभरासह विदेशात पोहोचविण्याचे काम भूषण कोरगावकर यांच्या ‘लव्ह ॲण्ड लावणी’ या प्रयोगातून करण्यात येते. मराठी, हिंदी आणि दखनी भाषेचा वापर या प्रयोगात करण्यात आला.
कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सारस्वत बँकेच्या मृदुला रेगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात दिग्दर्शक भूषण कोरगावकर, अभिनेत्री अनिता दाते आणि अभिनेता संभाजी ससाणे, कलाकार शकुंतलाबाई सातारकर, पुष्पा सातारकर, गौरी जाधव, गीता वाईकर, लता वाईकर तर, पेटीवादक चंद्रकांत लाखे, तबलावादक विनायक जावळे, ढोलकीवादक सुमित कुडाळकर, निर्माते विनोद जिरोंडकर, प्रकाश संयोजन योगेंद्र साने आणि ध्वनी संयोजन रुचिर चव्हाण यांचा समावेश होता.
ढोलकीवादनाला रसिकांची दाद
विनायक जावळे यांनी ढोलकीवादन करत ‘माझी मैना गावाकडं राहिली’ हे गाणे सादर केले. पारंपरिक लावण्यांसह हिंदी चित्रपटगीतांच्या चालींवर बांधलेल्या लावण्यांनी बारी अधिकच खुलवली. मूळचे शोभा गुर्टू यांनी गायलेले ‘का धरिला परदेस’ हे गाणे लावणीच्या स्वरूपात सादर झाले आणि लावणीचा अमर्यादित पट उभा राहिला. टाळ्यांचा कडकडाट, पुन्हा सादरीकरणाच्या शिफारसी अशी मनमोकळी दाद रसिकांनी दिली. कलावंतांसह महिला प्रेक्षकांनीही रंगमंचावर ठेका धरला.
