ठाणे : देशवासीयांवर हल्ला करणाऱ्या दशहतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे जशास तसे प्रत्युत्तर आपण दिले आहे. ‘ऑपरेशन महादेव’ द्वारे या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर पाकिस्तानच्या आसिफ मुनीरच्या भ्याड धमक्यांना भारत भीक घालणार नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर आपल्या देशावर टॅरीफ लादण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला असला तरीही भारत आत्मनिर्भर असल्याने त्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम होणार नाही असेही उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी ते बोलत होते. ज्या वीरांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा विसर पडता कामा नये. देशाची आज चौफेर प्रगती होत असून देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी झेपावत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे राहणार असून, ठाणे जिल्हा यात मागे राहणार नाही. महायुती सरकारने जिल्ह्याला ३ हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यानुसार ठाण्याचा चेहरामोहरा बदलत आहे.

उद्योग, शेती, स्वयंरोजगार यात जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, रस्ते, पुलांची अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत, ठाणे – बोरीवली टनेल, कोस्टल हायवे याद्वारे वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठाणे मेट्रोच्या कामांची पहिली ट्रायल सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे, अंतर्गत मेट्रोलाही मंजुरी दिली आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण होऊन तेही सेवेत दाखल होत आहे. एक प्रगत, सुखसोयींनी युक्त ठाणे जिल्हा घडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तसेच ठाणे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर, युवक, विद्यार्थी तसेच शासनाच्या १०० दिवस अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध विभागांना आणि अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी देण्यात आलेले हे सर्व पुरस्कार हे गुड गव्हर्नन्सचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन एक ऍप्लिकेशन तयार केले आहे, याद्वारे व्हॉट्सॲप द्वारे तक्रार करून नागरिकांना तात्काळ न्याय मिळेल. यापुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी व्हायला हवा आणि तक्रारींचे तात्काळ निवारण व्हायला हवे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी कार्यक्षम असून यापुढेही एक टीम बनून काम करा आणि जिल्ह्याला प्रगत जिल्हा बनवा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.