डोंबिवली – पहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिकांचे बळी गेल्याने संतप्त झालेल्या डोंबिवलीतील सर्व पक्षीय नेत्यांनी बुधवारी डोंबिवली बंदची हाक दिली. या हाकेला नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गुरुवारी आपली दुकाने, बाजारपेठा बंद ठेवल्या.

पहाटेपासून डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरांसह अंतर्गत रस्ते नागरिकांनी गजबजलेले असतात. या रस्त्यांवरील दुकाने, व्यापारी, बाजारपेठा सकाळीच सुरू होतात. दुकाने, भाजीपाला बाजारातील खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासून धांदल असते. गुरुवारी सकाळपासून डोंबिवली पूर्व, पश्चिम परिसरातील बाजारपेठा, दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी बंदमध्ये आपला सहभाग दर्शवला आहे.

पहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी या तिन्ही नागरिकांचे पार्थिव डोंबिवलीतील भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी आणल्यानंतर नागरिकांनी तुडुंब भरलेले मैदान शोकाकुल झाले होते. या शोकाकुल वातावरणात नागरिक रागाला आवर घालत पाकिस्तान निषेधाच्या आक्रमक होत घोषणा देत होते. काही नागरिकांनी तर रेल्वे स्थानक भागात स्वयंस्फूर्तीने जमवून केंद्र सरकार, राजकारणी, लोकप्रतिनिधी यांच्यावर शाब्दिक आसूड ओढले. आक्रमक नागरिकांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना केंद्र सरकार काय करत होते. कोठे गेले तुमची सुरक्षा व्यवस्था, स्वता एक्स, वाय झेड सुरक्षा व्यवस्थेत फिरायचे आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचे. देशोदेशीचे दौरे करायचे. जेव्हा राजकारणी लोकांच्या मुलांचे अपहरण होईल तेव्हा सामान्य नागरिकांचा जीव काय किमतीचा असतो, अशा संतप्त प्रतिक्रिया स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणारे नागरिक देत होते. यामध्ये एक जाणती महिला आक्रमकपणे केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढत होती.

लोकांच्या मनातील ही धग गुरुवारी डोंबिवली बंदच्या माध्यमातून दिसून आली. तिन्ही पार्थिव बुधवारी रात्री भागशाळा मैदानातून ट्रकमध्ये ठेवले जात असताना नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. नागरिकांच्या भावना विचारात घेऊन आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख विवेक खामकर, मनसेचे शहरप्रमुख राहुल कामत यांच्या एकत्रित विचारातून गुरुवारी डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा भागशाळा मैदानातून केल्यानंतर नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गुरुवारी सकाळपासून नागरिक, नोकरदार, परीक्षार्थी विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये म्हणून डोंबिवलीत रिक्षा, केडीएमटी, नवी मुंबई परिवहनच्या बस सुरू आहेत. बाजारपेठांमधील एकही दुकान न उघडले गेल्याने बाजारपेठा, व्यापारी पेठांमध्ये कडकडीत बंद आहे. बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी आहे. अनेक नोकरदार, व्यावसायिकांनी आपल्या खासगी आस्थापनाही बंद ठेवल्या आहेत.

बंद शांततेत पाळण्याचे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांनी केले आहे. बंद काळात अनुचित प्रकार नको म्हणून डोंबिवलीत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.