रखडलेल्या प्रकल्पाच्या निविदांना अखेर मंजुरी
ठाणे: कल्याण, डोंबिवली या शहरांतील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करण्यासोबतच ठाणे, कळवा यांना जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा बहुचर्चित कल्याण बाह्य़वळण रस्ता (बायपास) अखेर आता मार्गी लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असूनही रखडत गेलेल्या या मार्गाच्या तीन टप्प्यांतील तब्बल २६२ कोटी रुपयांच्या निविदांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला. दुर्गाडी ते टिटवाळा जंक्शन या १६ किमी अंतराच्या या मार्गाचे तीन टप्पे करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांच्या शुभारंभाचे बेत ‘एमएमआरडीए’ने आखले आहेत.
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांना वाहतूक कोंडीने ग्रासले आहे. अंतर्गत वाहतूक आणि बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे दोन्ही शहरांतील वाहनांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहराच्या बाहेरूनच जाणाऱ्या बाह्य़वळण रस्त्याची आखणी केली आहे. परंतु, हे काम खर्चीक असल्याने ते एमएमआरडीएमार्फत करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकूण ३० किमी लांबीच्या या रस्त्यापैकी दुर्गाडी पूल ते गंधारे पूल, गंधारे पूल ते मांडा जंक्शन आणि मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन अशा तीन टप्प्यांतील १६ किमी मार्गासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दोन कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली आहेत.
कमी दराच्या निविदा
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने काढलेल्या निविदेनुसार दुर्गाडी पूल ते गंधारे पुलाचे काम मेसर्स रेल्कॉन इन्फ्रा प्रोजेक्टस् या ठेकेदारास ७१ कोटी ८८ लाख ३१ हजार रुपयांना (२०.७० टक्के कमी दर), गंधारे पूल ते मांडा जंक्शन हे काम मेसर्स अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस १२९ कोटी २४ लक्ष ७४ हजार (१०.६० कमी दराने) आणि मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन हे ६१ कोटी ९५ लक्ष ५२ हजार रुपयांचे कंत्राट रेल्कॉन कंपनीस (१५.६६ कमी दराने) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या निविदा कमी दराने मंजूर करण्यात आल्या असून यासंबंधी कार्यकारी समितीने ठेकेदाराकडे मागविलेले स्पष्टीकरण ग्राह्य़ धरण्यात आले आहे.
बाह्य़वळण रस्ता कशासाठी?
* कल्याणमध्ये शिवाजी चौक, पत्रीपूल, दुर्गाडी पूल, डोंबिवलीतील महात्मा फुले रोड, पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल, शीळफाटा या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून बाह्य़वळण रस्ता उभारण्यात येत आहे.
*हा रस्ता तयार झाल्यानंतर पुणे, कोकण व इतर राज्यातून येणारी वाहने मुंब्रा वळण रस्त्याने शिळफाटय़ाला संलग्न असलेल्या कल्याण बाह्य़वळण रस्त्याने कल्याण शहराच्या दिशेने जातील. तेथून ती दुर्गाडी उड्डाण पूल, गंधारे उड्डाण पूल संलग्न रस्त्याने भिवंडी, पडघा वळण रस्त्याने मुंबई- नाशिक महामार्गाच्या दिशेने जातील.