लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली होती. आता ही प्रवेशबंदी २३ एप्रिलपर्यंत कायम असणार आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदीर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यामुळे अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम येथील अनधिकृत दर्गा विषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा शहरात वन विभागाची जागेत उभ्या असलेल्या दर्गा, मशीद आणि मजार विषयी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच १५ दिवसांत कारवाई झाली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार, अविनाश जाधव यांना ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी होती. आता ही बंदी २३ एप्रिलपर्यंत कायम असणार आहे.