डोंबिवली – कल्याण ग्रामीणचे मनसेचे नेते राजू पाटील यांचे लंगोटी मित्र डोंबिवलीतील एकतानगर प्रभागाचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, त्यांंच्या पत्नी ज्योती मराठे आणि मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या मनसे नेते राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजू पाटील यांनी आपला जीवाभावाचा, एक बैठकीचा अनेक वर्षाचा मित्र शिंदे शिवसेनेत गेल्याने आपल्या मित्रावर ट्वीटरच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे.

एखाद्या माणसाला पोर होत नाही. तेव्हा तो माणूस पोर दत्तक घेतो. आता गद्दारांच्या टोळीत सगळेच इकडून तिकडून उचलून आणलेले दलबदलू आहेत. इतर पक्षांमधून फोडून आणल्याशिवाय या गद्दारांची टोळी फुगणार नाही. त्यासाठी पक्ष फोडीतून दलबदलूंना उचलण्याची मोहीम गद्दारांनी सुरू केली आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.

पुढे राजू पाटील सांगतात, ज्यांचे दूध टाकून दिवस चालले होते. पण ते सदवर्तनी, प्रामाणिक वाटल्याने त्यांना जीवाभावाचा माणूस म्हणून सर्व प्रकारचा आधार दिला. मोठा केला. धंदा पाणी दिला. कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांना आम्ही वागणूक दिली. असे हे खाऊन पिऊन धनदांडगे धष्टपुष्ट होऊन आता आमच्या खांद्यावर लघुशंका करून, पाय देऊन खुशाल माणूसकी, आपुलकीच्या भावाला चिखलात, खड्ड्यात तुडवून गद्दारांच्या गटात सामील होतात. तेव्हा आता विश्वास ठेवायचा कोणावर? असा प्रश्न राजू पाटील यांनी केला आहे.

मनसेचे राजू पाटील आणि मनसेचे डोंबिवलीतील एकतानगरचे माजी नगरसेवक राजन मराठे जीवश्च कंठश्च मित्र. एक दिल, एका विचाराने वागणारे. पण, सोमवारी राजन मराठे यांनी अचानक शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. हाच धागा पकडून राजू पाटील यांनी या दलबदलूंना ट्वीवटर (एक्स) आणि प्रत्यक्ष दिलेल्या प्रतिक्रियेतून टीकेचे लक्ष्य बनवले आहे.

अगोदर स्वत: गद्दारी करून पक्ष फोडला. आता ही गद्दारांची टोळी गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन फुटलेले हे आता तोच पायंडा जतन करण्यासाठी इतरांना खोके वाटत फिरत गद्दारांना आपल्या टोळीत घेत आहेत. इमान आणि निष्ठा म्हणजे काय असते हे यांना कधी कळणार. आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे इमान आणि निष्ठेचे महत्व या गद्दारांच्या टोळीला काय कळणार, असा उद्विग्न सवाल पाटील यांनी केला आहे.

स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसायचा हीच यांची निती. या गद्दारांमुळे संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला आहे. पोरगं होत नसले की दुसऱ्याचं पोरगं दत्तक घेतले जाते. तसच आता ही गद्दार टोळी इतर गद्दारांना आपल्या मांडीवर बसून घेत आहे. आणि खाऊन पिऊन मोठे झालेले निष्ठेच्या खांद्यावर पाय देऊन, लघुशंका करून गद्दारांच्या टोळीत जाऊन बसत आहेत. या गद्दारांना आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी दिला. आहे.