कल्याण – कल्याण शीळ रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलावरील रस्त्यावर वाहने समतलपणे धावाधावीत यासाठी ठेकेदाराकडून पुलावरील रस्त्याला सिमेंट, डांबर यांचा वेष्टनाधित थर लावण्यात येणार होता. हे काम प्रलंबित असताना काही दिवसांपूर्वी घाईघाईत शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ, त्यांचा ठेकेदार यांची परवानगी न घेता काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे (पलावा) उद्घाटन केले.
पुलावरील रस्त्याला नियोजनातील वेष्टनाधित रसायनाचा थर न लावण्यात आल्याने आता या पुलावर खड्डे पडले आहेत. पुलावरून वाहने धावताना विमान ढगांमधून उडताना कसे धडधड आवाज करते तसा वाहनात बसलेल्या प्रवाशांना आवाज येत आहेत. या पुलावरून काटई दिशेने शिंदे शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या बंगल्याच्या दिशेने उतरताना वाहन चालकाला आपण घसरगुंडीवरून वाहन घेऊन उतरतो की काय अशीच भीती वाटते. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी उद्घाटन केलेल्या या पुलावरील कामाच्या गुणवत्तेचा खून झाला आहे.
या पुलावर खड्डे पडले आहेत. पुलावर समतलपणा नाही. पुलाच्या दोन्ही बाजुला वाहने उतरवित असताना असताना वाहन चालकाला आपण डोंगरावर एका पाटावर बसून घसरगुंडी करत झरझर खाली येत आहोत की काय असा भास होतो, अशी टीका करत मनसे नेते राजू पाटील यांनी पुलावरील कामाच्या गुणवत्तेचा खून झालाच आहे. पण या पापाचे नाथ कोण आहेत? असा सवाल केला आहे.
या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिंदे शिवसेनेचे आमदार, पदाधिकाऱ्यांनी घाई केली. तशीच या पुलावरील निकृष्ट कामाची जबाबदारी घेण्यासाठीही शिंदे शिवसेनेच्या स्थानिक आमदार, पदाधिकाऱ्यांनी आता पुढे यावे. वरून इशारा आल्या शिवाय काटई निळजे पुलाचे उद्घाटन होऊ शकत नाही. त्यामुळे इशारा देणाऱ्यांनी या पुलावरील कामाचा जो चोथा, चिखल केला आहे. त्याचीही जबाबदारी घ्यावी, असे राजू पाटील यांनी सांगितले.
या पुलाचे योग्य नियोजनाने शेवटच्या टप्प्यातील काम ठेकेदाराला पूर्ण करून देण्यात आले असते तर आता लोकांना नव्या कोऱ्या पुलावरून खडबड करत, धक्केबुक्के खात प्रवास करावा लागला नसता. देसाई खाडीवरील काटई निळजे पूल आता भ्रष्टनाथ पूल म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.
हार-पेढ्यांचा विसर
काटई निळजे पूल सुरू करावा म्हणून दोन महिन्यापूर्वी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, राजू पाटील यांनी पलावा भागात एकत्रित मोर्चा काढला होता. पुलाचे श्रेय हे दोन्ही नेते घेण्याची शक्यता विचारात घेऊन शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी पुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त म्हणून लागणाऱ्या हार, पेढे अशा कोणत्याही गोष्टींचा विचार केला नाही. दुकानातून घाईत ४० नारळ आणले आणि देवाच्या नावाने फोडले. मनात खोटेपणा असल्याने देव पावला नाही आणि पुलाला त्याचा कायमस्वरुपी फटका बसला, असे राजू पाटील यांनी सांगितले.