कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे राज्यकर्ते जसे वागत आहेत. त्याच कार्य पध्दतीने त्यांचे कल्याण डोंबिवली पालिकेतील होयबा अधिकारी वागत आहेत. त्यामुळे वर्ग एक, वर्ग दोन दर्जाचे आणि अन्य एक असे कल्याण डोंबिवली पालिकेचे एकूण तीन कर्मचारी एकाच दिवशी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडतात. यात आश्चर्य असे काही नाही. आपले काम झाले ना बस्स, खड्ड्यात गेली जनता, असेच या पालिकेवरील नियंत्रक राज्यकर्त्यांचे काम आहे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांवर केली आहे.

गुरूवारी दुपारच्या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतील एक अभियंता, एक मुख्य स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक असे तीन जण दोन वेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात लाच घेताना सापडल्याने पालिका प्रशासनावर नागरिकांकडून सडकून टीका केली जात आहे. हाच धागा पकडून पालिकेवर आपलीच वतनदारी या तोऱ्यात वावरणाऱ्या पिता-पुत्रांना कोठेही न सोडण्याचा विडा उचललेल्या राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतील गैरव्यवहारी, शासकीय, स्थानिक अधिकाऱ्यांना लाचखोरीवरून पालिकेवरील नियंत्रक राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

गेल्या तीस वर्षाच्या कालावधीत पालिकेत एकूण ४७ कर्मचारी ठेकेदार, नागरिक यांच्याकडून लाच घेताना पकडले आहेत.पालिकेतील गैरव्यवहारी, अनगोंदी आणि मनमानीच्या कारभारामुळे शहरातील जनता विकास कामे, नागरी समस्यांमुळे सापळ्यात अडकली आहे. कल्याण, डोंबिवली शहरातील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरांमध्ये नियोजन न करता, रूंदीकरण न करता सीमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. शहरात काय चाललय, यापेक्षा अधिकारी वर्ग आपल्या वातानुकूलित दालनात बसून मस्त बैठकांमध्ये व्यस्त आहे.

आदर्शवत असे एकही काम कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सुरू नाही. स्मार्ट सिटी कामांचा पेर पडला आहे. या सर्व कामांनी गती घ्यावी यासाठी कोणीही अधिकारी नाहीच, पण यांचा नियंत्रक राजकीय पिताही पुढाकार घेत नसल्याची टीका राजू पाटील यांनी केली आहे.जे पिंडी ते ब्रम्हांडी असे म्हणतात. त्यामुळे जसे पालिका राजकीय नियंत्रक, तसेच त्यांचे होयबा. त्यामुळे नागरी समस्या, विकास कामे अशा सगळ्या गर्तेत सामान्य जनता पिचून गेली आहे आणि पालिका अधिकारी मात्र मस्त मालेमाल होण्यासाठी, शेतघर सजविण्यासाठी लोकांना लुटत आहेत, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे. हे सगळे हाताबाहेर चालले आहे. त्याला वेळीच रोखा, अशी गळ राजू पाटील यांनी शासनाला घातली आहे.