अंबरनाथ : रासायनिक सांडपाणी सोडल्याचे अंबरनाथच्या चिखलोली धरणातील मासे मृत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे याच चिखलोली धरणातून अंबरनाथ शहरातील बहुतांश भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अशा कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मे. आर. के. इंजिनिअरिंग वर्कस या उद्योगाची स्थळ पाहणी करून गंभीर त्रुटी आढळल्याने अखेर या उद्योगावर बंदीचे आदेश पारित करण्यात आले. तसेच कंपनीचे वीज आणि पाणी तोडल्याचे मंडळाने सांगितले आहे.
अंबरनाथ शहराला तीन जलस्त्रोतांमधून पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ केंद्रातून चिखलोली धरणातून आणि बदलापुरातील बॅरेज बंधाऱ्यातून शहराला पाणी पुरवले जाते. यातील चिखली धरण हे अंबरनाथ शहराच्या वेशीवरच आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असल्याने अंबरनाथकरांना हक्काचा पाणीपुरवठा होतो. मात्र याच धरण क्षेत्राच्या लगत आशिया खंडातील मोठी औद्योगिक वसाहत आहे. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहतीत हजारो उद्योग आहेत. यात अनेक रासायनिक उद्योग आहेत. रासायनिक उद्योगातून निघणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट जलस्त्रोतांमध्ये सोडण्याचे अनेक प्रकार अंबरनाथ मध्ये उघडकीस आले आहेत. काही वर्षांपूर्वी चिखली धरणाच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेला रासायनिक कचरा टाकण्यात आला होता. त्यावेळी धरण क्षेत्र प्रदूषित होण्याची भीती निर्माण झाली होती. यावेळी माध्यमांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर याप्रकरणी एका कंपनीवर कारवाई झाली. त्यानंतरही धरण क्षेत्राच्या शेजारी प्रदूषणकारी घटना घडत होत्या.
काही दिवसांपूर्वी याच धर्म क्षेत्रात येऊन मिळणाऱ्या नैसर्गिक ओहोळांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे दिसून आले होते. यामुळे धरण क्षेत्रातील माशांचा मृत्यू झाल्याची घटना हीच उघडती झाली होती. त्यानंतर पुन्हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मे. आर. के. इंजिनिअरिंग वर्कस या उद्योगाची पाहणी करण्यात आली होती. पाहणीदरम्यान प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे १२ सप्टेंबर २०२५ रोजी मे. आर. के. इंजिनिअरिंग वर्कस या कंपनीला बंदचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर महावितरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) या विभागांना वीजपुरवठा व पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्यास सुचित करण्यात आले. या सूचनेनुसार दोन्ही विभागांकडून वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला प्राप्त झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, चिखलोली धरणाचे पाणी दूषित झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल घेत पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय, पाण्यातील प्रदूषणामुळे झालेल्या मासेमृत्यूच्या घटनांचा तपास व्हावा म्हणून सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), ठाणे-पालघर कक्ष यांनाही अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे.