डोंबिवली : येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगमंचीय कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी शहर परिसरातील अनेक रसिक प्रेक्षक दुचाकी वाहनाने येतात. या प्रेक्षकांना आपली दुचाकी वाहने नाट्यगृहाच्या आवारात उभी करुन देण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांची होणारी ही कुचंबणा दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

नाट्यगृहाच्या आवारात चारचाकी वाहने उभी करुन ठेवण्यासाठी प्रशस्त जागा आहे. अशाच पध्दतीने आतील प्रशस्त जागेत प्रेक्षकांची दुचाकी वाहने उभी करुन ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी. प्रेक्षकांना नाट्यगृह आवारात दुचाकी ठेवण्यासाठी परवानगी नसल्याने ही वाहने रस्त्यावरील पदपथाच्या कोपऱ्यावरील चिखलात, पदपथावर दाटीवाटीने उभी करुन ठेवावी लागतात, असे नाट्य परिषद पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या दोन मेकअप आर्टिस्ट महिलांना अटक

हेही वाचा : कल्याण: भटक्या कुत्र्यांना खायला देते म्हणून तरुणीला जीवे मारण्याची धमकी

ही वाहने रस्त्यावर अंधारात असल्याने अनेक वेळा भुरट्या चोरांकडून या वाहनांचे सुट्टे भाग, आरसे काढून नेले जातात. काही वेळा वाहनांची चोरी झाल्याचे प्रकार या भागात घडले आहेत. नाट्यगृहात रसिक दर मोजून आलेला असतो. त्यामुळे त्यांना तशी मुभा देण्यास अडचण नाही. अन्यथा प्रेक्षकांना दुचाकीसाठी काही रास्त दर लावला तरी प्रेक्षक तो भरण्यास तयार आहेत. दुचाकी घेऊन सावित्रीबाई फुले नाट्यगृहाकडे येणाऱ्या प्रेक्षकांची अडचण विचारात घेऊन आपण तातडीने दुचाकी वाहन चालकांना आवारात वाहने उभी करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या पत्रावर निशीकांत रानडे, दीपाली काळे, दुर्गाराज जोशी, धनंजय चाळके, प्रमोद पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.