ठाणेः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काही दिवसात व्यावसायिक उड्डाणे सुरू झाल्यानंतर नवी मुंबईकडे आणि विशेषतः विमानतळाकडे वाहनांची संख्या वाढणार आहे. मात्र त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि वाहतूक यंत्रणा नसल्याची बाब नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मनुष्यबळासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. ठाणे जिल्ह्यातील बिघडलेली वाहतूक स्थितीच्या पार्श्वभूमीवर यासाठी तातडीने पाऊले न उचलल्यास येत्या काळात विमानतळ गाठणे जिकीरीचे होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरासाठी तासंतास कोंडीत अडकून पडावे लागते. ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणे म्हणजे कोंडीत अडकणे अशी स्थिती झालेली आहे. अवजड वाहतूक बंदी करूनही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. खड्डे, वाहतूक कर्मचाऱ्यांची कमतरता, रखडलेले प्रकल्प यासाठी कारणीभूत आहेत. मात्र लवकरच ठाण्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेच्या हाती विमानतळ दिल्यानंतर दीड महिन्यात येथून व्यावसायिक उड्डाणे होऊ शकतील.

त्यामुळे पर्यायाने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विमानतळाकडे आणि परिसरात वाहनांची संख्या वाढणार आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वाहतुकीचा उडालेला बोजवारा पाहता नवी मुंबई विमानतळासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी नव्याने नियोजन करण्याची गरज पडणार आहे. अन्यथा नवी मुंबई विमानतळ गाठणे आव्हानात्मक होईल. याच विषयावर शुक्रवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाला आवश्यक मनुष्यबळाची माहिती जाणून घेतली.

अतिरिक्त आयुक्तासह नवे वाहतूक उपायुक्त

सध्याची वाहतूक पोलिसांची कुमक गरजेपेक्षा खुप कमी आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्त, ठाणे, नवी मुंबईसाठी आणखी एक वाहतूक पोलीस उपायुक्त नेमणे गरजेचे आहे. त्याची मंजुरी सरकारकडून मिळणे गरजेचे आहे. सोबतच त्या पदाखालील पदेही तातडीने भरण्याची गरज उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवून दिली.

अवजड वाहतूक नियंत्रण आवश्यक

गेल्या काही दिवसात रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे रखडणारी अवजड वाहतूक यामुळे इतर वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू न्यासातून येणारी अवजड वाहने, तळोजा, पनवेल ते थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करतात. त्यांचे व्यवस्थापन, प्रवासी वाहनांची विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यासाठीचेही आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.