ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला पार पडले. नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि बा पाटिल यांचे नाव देण्याबाबत उद्घाटन कार्यक्रमात उल्लेखही केला नसल्याने भुमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विमानतळाला दिवंगत नेते आणि समाजसेवक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीने सध्या तरी डिसेंबरपर्यंत कोणताही आंदोलन करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला माजी खासदार दि .बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र २०२१ पासून करित आहेत. यासाठी दि.बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकार तसेच केंद्रीय विमान उड्डायन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने भुमिपुंत्रांनी केली. यापुर्वी ३० सप्टेंबर रोजी अचानकपणे विमानतळाकरता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने परवाना जारी करण्यात आला.

लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य महेंद्र घरत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांना आश्वासन दिले आहे की “लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” हे नाव तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे.

आमची ३ ऑक्टोबरला फडणवीस यांच्याशी भेट झाली. त्यांनी सांगितले की पंतप्रधान सुद्धा विमानतळाचे नाव लोकनेते दि बा पाटील यांच्या नावावर ठेवण्याबाबत सकारात्मक आहेत. पण त्यासाठी एक प्रक्रिया आहे. केंद्र सरकारकडून एक फॉर्म राज्याकडे पाठवला जाईल, तो भरून परत पाठवावा लागेल. त्यानंतर अंतिम मंजुरी मिळेल. याला दोन महिने लागू शकतात,” असे घरत यांनी यावेळी सांगितले.

तर विमानाला उड्डाण करू देणार नाही

आम्ही डिसेंबर अखेरपर्यंत वाट पाहू. जर नामांतराबाबत लिखित निश्चिती मिळाली नाही किंवा नाव तिकिटांवर आणि फ्लाइट घोषणा प्रणालीमध्ये दिसले नाही, तर कोणत्याही विमानाला उड्डाण करू देणार नाही, असा इशारा घरत यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की पुणे (जगद्गुरु संत तुकाराम) आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळांच्या नामांतर प्रस्तावांची प्रक्रिया आधीच पुढे गेली आहे, तर नवी मुंबई विमानतळाला त्यातून अपवाद असू नये.