राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्यामुळे ठाण्यातील राजकीय घडामोडींकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं.त्यात शिंदे कुटुंबाशी संबंधित घडामोडी चर्चेचा विषय ठरतात. अशाच प्रकारे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. श्रीकांत शिंदे यांचा ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकात श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. याचे फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोकच शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात पोटनिवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. नौपाडा पोलीस स्थानकात श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या वतीने पोलिसांना गणवेश वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचे फोटो खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच त्यांच्या ट्विटरवरही शेअर केले आहेत. मात्र, त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. तसेच, थेट राज्याचे डीजी रजनीश सेठ यांनाच एक खोचक विनंती केली आहे.

“एक नक्की हिला दिया”, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं; म्हणाले, “४० लोकांनी राजीनामा दिला तरी…”

आनंद परांजपेंचा आक्षेप!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवर टीका केली आहे. “श्रीकांत शिंदे यांचा शनिवारी वाढदिवस झाला. तो वाढदिवस ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्थानकात साजरा झाला. डीसीपींनी त्यांना केक भरवला. त्यांनी डीसीपींनी केक भरवला.माझी खरंतर राज्याचे डीजी रजनीश सेठ यांना विनंती आहे की त्यांनी एक परिपत्रक काढावं आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस विविध पोलीस स्थानकांत साजरे करण्याची परवानगी द्यावी”, असं आनंद परांजपे म्हणाले आहेत.

काय घडलं कार्यक्रमात?

यावेळी नौपाडा पोलीस स्थानकात श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. श्रीकांत शिंदेंनी उपस्थित पोलिसांना केक भरवल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच, श्रीकांत शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोंमध्येही समोर टेबलवर केक ठेवल्याचं दिसत आहे. यावरून सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp anand paranjape mocks mp shrikant shinde birthday celebration in naupada police station pmw