ठाणे : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे माध्यमांमध्ये त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची वाढदिवस साजरा करण्यासाठी रीघ लागली होती. या कार्यकर्त्यांसोबत आव्हाड यांनी गाण्यांवर शिट्ट्या वाजवत, गाण्यांवर ठेक धरत वाढदिवस साजरा केला. आव्हाड यांनी यानंतर भावनिक पोस्ट करत सेलिब्रेशन तो बनता है… म्हणत कार्यकर्त्यांचे आभार देखील व्यक्त केले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी वाढदिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले. दुसरीकडे आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू अससेले आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन भाग पडले असले तरी अनेक मुंब्रा, कळवा भागातील काही पदाधिकारी आजही आव्हाड यांच्यासोबत आहेत. आव्हाड यांचा मंगळवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या विविध भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच आव्हाड यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते गर्दी करत होते. दरम्यान, मंगळवारी आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करताना शिट्ट्या वाजवित आणि कार्यकर्त्यांसोबत गाण्यांवर ठेका धरला. त्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. तसेच एक पोस्ट देखील आव्हाड यांनी लिहीली होती.

म्हणाले सेलिब्रेशन तो बनता है…

वाढदिवस म्हणजे काय असतो….आपल्या धावपळीच्या आयुष्यातील एक स्पेशल दिवस आपल्या पैकी अनेकांचा असा अनुभव असेल ज्या दिवशी असं काहीतरी वेगळंच वाटत राहतं…जणू काही हा संपूर्ण दिवस आपल्याच साठी बनलेला असावा…पण आता वाढत्या जबाबदारींमुळे जनतेच्या सेवेसाठी अंगीकारलेल एक वर्ष देखील कमी झालंय ह्याची जाणीव होते…पण आता सार्वजनिक आयुष्यात असल्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है….

तेव्हा काल अनेक कार्यक्रम झाले. गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य वाटप, अनेक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, अनेकांच्या भेटी गाठी , मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे भरगच्च कार्यक्रम….दोन दिवसांपासून एकदम शेड्युल भयंकर व्यस्त…..त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दिलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छा यांचा अत्यंत विनम्रतेने स्वीकार करत आशिर्वाद रुपी शुभेच्छा देणारे आबालवृद्ध-बच्चेकंपनी ,जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते,मतदार व हितचिंतक , सर्वच सहकारी यांचे आभार मानतो, असाच प्रेम स्नेह वृद्धिंगत होत रहावा, आपणा सर्वांचे आभार, असे आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीले आहे.