कल्याण – मागील दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस मुसळधार पद्धतीने कोसळत नसला तरी पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यांवर चिखल, पाण्याने भरलेले खड्डे आणि बाजारपेठांमध्ये पालिकेच्या कारवाईमुळे निवारे उभे करण्याची सोय नसल्याने कल्याण, डोंबिवली शहरांमधील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यात आपटून रिक्षा जागोजागी बंद पडल्याचे दृश्य आहे. त्यामुळे रिक्षा वाहनतळांवरील रिक्षांची संख्या कमी आहे. वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज मात्र दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी, रिक्षा वाहनांनी गजबजून गेली आहेत. श्रावण महिन्यात केळीची पाने, गौरीच्या फुलांना मागणी असते. मलंगगड जंगल, बदलापूर परिसरातून अनेक महिला सकाळीच रानकेळीची पाने, गौरीची फुले विकण्यासाठी बाजारात आल्या आहेत. पण पावसामुळे त्यांना इतर दुकाने, इमारतींचा आडोसा घेऊन विक्री व्यवहार करावे लागत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानक परिसर, बाजार समिती, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर बाजारपेठांचा आहे. सोमवारी सकाळी या बाजारपेठा इतर दिवशी नागरिकांच्या गर्दीमुळे गजबजून गेलेल्या असतात. दोन दिवसांपासून या बाजारपेठांमध्ये तुरळक गर्दी दिसत आहे. बदलापूर, मलंगगड, भिवंडी ग्रामीण भागातून अनेक महिला पावसाळ्यातील रानभाज्या घेऊन बाजारात दाखल होतात. या भाज्यांचा कालावधी एक ते दोन महिन्यांचा असतो. औषधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाज्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. या रानभाज्यांमध्ये करटोली, घोळु, केळफूल अशा अनेक भाज्यांचा समावेश असतो.

संततधार पाऊस सुरू असला तरी लोकल वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे प्रवासी समाधानी आहेत. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील ज्या रेल्वे स्थानकांमध्ये विस्तारित फलाटाच्या जागेवर निवारे उभे करण्यात आले नाहीत. त्या फलाटांवर पावसाची गळती सुरू असल्याने प्रवाशांना पावसात भिजत लोकलमध्ये चढावे लागते. कल्याण, डोंंबिवली शहराच्या अनेक भागात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. संततधार पावसामुळे ही कामे बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्ते कामांच्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक वेळा वाहने बंद पडत आहे. त्यामुळे इतर वाहने या बंद वाहनामागे अडकून पडत असल्याने शहरा अंतर्गत रस्ते कोंडीत अडकत आहेत.

कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. खाडीच्या पाण्यात वाढ झाली आहे. स्थानिक रहिवासी उल्हास, देसाई नदी काठी, ओढयांमध्ये गळ टाकून मासे पकडण्यासाठी बसल्याचे चित्र आहे. श्रावण महिना असला तरी मासळी बाजारांमध्ये विक्रेते, ग्राहकांची गर्दी आहे.