ठाणे – मुंब्रा बायपासवर बुधवारी रात्री भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, दुचाकीस्वार तरुणाच्या पायाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात फरार ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राबोडी येथील बापूजीनगर परिसरात राहणारा जुनैद सय्यद (२३) त्याच्या दुचाकीवरुन मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेने येत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अलिशेर खान होता. दोघे मुंब्रा बायपास येथील जुन्या टोलनाक्याजवळ आले असता, त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रेलर चालकाने धडक दिली. या धडकेत अलिशेर याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात जुनैद याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापक्रकणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस ट्रेलर चालकाचा शोध घेत आहेत.