रंगमंदिराचा पडदा दूर झाला आणि ‘पंचतुंड नररुंडमालधर…..’ या नांदीचे सुस्वर कानी पडले. रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीमध्ये अवतरला. सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे शनिवारी रात्री सादर झालेल्या संगीत रस सुरस या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना ही सांगीतिक मेजवानी अनुभवायला मिळाली. यानिमित्ताने सवेष नाट्यगीतांचे सादरीकरण रसिकांना बघायला मिळाले. दिपावली पूर्वसंध्येला धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर ‘संगीत रस सुरस’ हा संगीत रंगभूमीच्या सुर्णकाळातील अनुभव देणारा, मंत्रमुग्ध करणारा सोहळा डोंबिवलीकर रसिकांना ऐकायला, पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर ठाण्यातील बाजारपेठा गजबजल्या; अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाजारपेठेत पोलिसांची गस्त

नटी व सूत्रधाराच्या वेशभूषेतील सुसंवादिका धनश्री लेले आणि डॉ. प्रसाद भिडे यांनी आपल्या भूमिकांचा बाज लिलया सांभाळला. त्याचबरोबर केतकी चैतन्य , ऋषिकेश अभ्यंकर , ओंकार प्रभुघाटे , धनंजय म्हसकर , संपदा माने या कलाकारांनी विविध नाट्यगीते आपल्या शैलीत सादर केली. स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, होनाजी बाळ, मंदार माला, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, कुलवधू इत्यादी संगीत नाटकातील संस्मरणीय पदे रसिकांना अनुभवायला मिळाली. निरंजन लेले आणि प्रसाद पाध्ये यांनी या कलाकारांना साथ केली.

हेही वाचा- कल्याणमधील गुरुजींचा मुलगा अभिषेक साळेकर सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत राज्यात प्रथम

राधाधर मधु मिलिंद,प्रिये पहा, नाथ हा माझा, खरा तो प्रेमा, कर हा करी, श्रीरंगा कमलाकांता, सत्यवदे वचनाला नाथा, कशी या त्यजू पदाला, देवाघरचे कुणाला, गर्द सभोवती रान साजणी यासारख्या गाजलेल्या गीतांचे पारंपरिक सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना आदित्य बिवलकर याची होती. मधुमालती एंटरप्रायझेस, रघुलिला एंटरप्रायझेस आणि वेध अकॅडमी या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला उपस्थित रसिक डोंबिवलीकरांचे अत्तर लावून तसेच गुलाब पाणी शिंपडून स्वागत करण्यात आले आणि पेढा देऊन दिपावली अभिष्टचिंतन करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organized sangeet ras suras program on the occasion of diwali at savitribai phule kalamandir in dombivli thane dpj