बाधित वन जमिनीच्या बदल्यात गडचिरोलीत जागा देणार

ठाणे : वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख असा खाडीकिनारा मार्ग तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले आहेत. यानुसार महापालिका प्रशासनाने भूसंपादनासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधित होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला पर्यायी जमीन देण्यासंबंधी तयार केलेल्या प्रस्तावाला शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिली. या प्रस्तावानुसार गडचिरोली येथे ही जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६१ लाख ४९ हजार ५९१ रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. या प्रस्तावामुळे खाडी किनारा मार्गातील वनविभागाच्या परवानगीचे अडथळे दूर होणार आहेत.

 घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खाडीकिनारा मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. खारेगाव ते गायमुख असा १३ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या कामामध्ये काही प्रमाणात कांदळवन क्षेत्र बाधित होणार आहे. या मार्गाच्या कामात कमीत कमी कांदळवन क्षेत्र बाधित व्हावे यासाठी पालिकेने पावले उचलली होती. त्यासाठी आरक्षण फेरबदल केले होते. या खाडी किनारा मार्गाच्या कामासाठी १३१६ कोटी १८ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी एमएमआरडीएकडे सादर केला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याचे निर्देश एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिले होते. तसेच या प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रस्तावास एमएमआरडीएने मंजुरी दिली असून त्यात पर्यावरण व्यवस्थापन योजना आणि वनमंजुरी अंमलबजावणीकरिता ५ कोटी ५० लाख रुपये इतक्या रक्कमेस मंजुरी दिली आहे.

या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधीत होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वनविभागाला हस्तांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. त्यात १५ हेक्टर वनीकरण अनुकुल जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने केली होती. त्यानुसार गडचिरोली येथील वडसा येथे पर्यायी जमीन उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला कळविले होते. या जमिनीबाबत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी वडसा येथील उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली होती. ३० हेक्टर जमीन उपलब्ध होत असल्याबाबतही वनसंरक्षकांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले होते.

उप वनसंरक्षकांनी आता पर्यायी जमीन घेण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार यासाठी आता १ कोटी ६१ लाख ४९ हजार ५९१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ही रक्कम ठाणे महापालिकेला वनविभागाकडे जमा करावी लागणार असून यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेने तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. भविष्यात ही रक्कम एमएमआरडीएकडून मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावास सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिली.

१ कोटी ६१ लाख खर्च

खाडी किनारा मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधीत होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वनविभागाला हस्तांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. त्यात १५ हेक्टर वनीकरण अनुकुल जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने केली होती. यासाठी आता १ कोटी ६१ लाख ४९ हजार ५९१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ही रक्कम ठाणे महापालिकेला वनविभागाकडे जमा करावी लागणार आहे.