राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव गुन्ह्यांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. ठाणे पोलीस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग हे जनरल डायर आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठाणे पोलीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली काम करत असल्याचेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई ते गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे आमदारांना आश्वासन

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. आहेर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. शुक्रवारी ठाणे न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. त्यासंदर्भाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. या गुन्ह्यात आव्हाड यांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले. यापूर्वी मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगच्या प्रकरणातही न्यायालयाने आव्हाड यांचा हेतू विनयभंग करण्याचा नव्हता. असे निरीक्षण नोंदविले होते. या मारहाणाच्या प्रकरणातही आहेर यांनी हल्लेखोरांकडे चाॅपर, बंदूक असल्याचे म्हटले होते. पण तसे कोणतेही हत्यार पोलीस जप्त करू शकले नाही. न्यायालयाने म्हटले हा हल्ला हाताने झालेला आहे. ३०७ कलम लावला कसा? जितेंद्र आव्हाड यांचे नाव मुद्दाम दिल्याचे न्यायालयाचे निरीक्षण असल्याचे ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police work under cm eknath shinde pressure allegation by ncp leader anand paranjape zws