नवी मुंबईसह अन्य पालिका क्षेत्रांत उमेदवारांमध्ये स्पर्धा
जयेश सामंत, लोकसत्ता
ठाणे : लसीकरणासाठी सर्व यंत्रणा सज्ज असूनही मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लशींचा तुटवडा आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्रातील काही राजकीय नेते खासगी रुग्णालयांना हाताशी धरून मोफत आणि सशुल्क लसीकरण शिबिरे आयोजित करत असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईतील एका बडय़ा नेत्याने आपल्या समर्थकांमार्फत एका खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो लशी मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात केली आहे. ठाणे, कल्याण -डोंबिवलीसारख्या शहरांमध्येही काही राजकीय नेत्यांनी अशाच पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. राजकारण्यांच्या या लसीकरण शिबिरांमुळे शासकीय यंत्रणाही अवाक झाल्या आहेत.
उत्पादकांकडून थेट लसखरेदीची मुभा मिळाल्याने मुंबई, नवी मुंबईस्थित काही बडय़ा रुग्णालयांनी लशींचा साठा मिळवला. काही खासगी रुग्णालयांनी मोठय़ा कंपन्यांशी करार करुन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सशुल्क लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुंबई, नवी मुंबईत आतापर्यत २० पेक्षा अधिक ठिकाणी खासगी लसीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
लशींच्या अपुऱ्या साठय़ामुळे राज्य सरकारने १८ ते (पान २ वर) (पान १ वरून) ४४ वयोगटातील मोफत लसीकरण स्थगित केले असले तरी खासगी लसीकरण केंद्रांची संख्या मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यात सर्वत्र वाढताना दिसते. ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेनेही लस खरेदीसाठी कंबर कसली असून, जागतिक निविदा मागवल्या आहेत. या निविदांना अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ४५ वर्षांवरील वयोगटासाठी नागरिकांच्या लस मोहीमेत लस तुटवडय़ामुळे सातत्याने खंड पडत आहे. सहजपणे लस उपलब्ध होत नसल्यामुळे विशेषत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढू लागल्याने खासगी रुग्णालयांना हाताशी धरुन लसीकरण मोहीमेत राजकीय श्रेयवादाचे राजकारण आता रंगू लागले आहे.
खासगी लसीकरणासाठी स्पर्धा
मुंबई, नवी मुंबईत सशुल्क लसीकरणात राजकीय मंडळींचा वावर वाढू लागला असताना ठाणे, कल्याण-डोंबिवलीत एकाही खासगी रुग्णालयाला उत्पादक कंपन्यांकडून दाद मिळालेली नाही. मुंबई, नवी मुंबईत बडय़ा उद्योग समूहांशी संबंधित रुग्णालये आहेत. ठाण्यात असे रुग्णालय नाही. त्यामुळे नवी मुंबईतील अपोलो, रिलायन्स यासारख्या रुग्णालयांशी ठाण्यातील काही नेत्यांची चर्चा सुरू असून घोडबंदर, जुन्या ठाण्यातील मोठय़ा वसाहतींमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्यासाठी शिवसेना, भाजपमध्ये स्पर्धा सुरु असल्याची चर्चा आहे.
मोफत लसीकरणाचा राजकीय मार्ग
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार यासारख्या पालिकांमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, ठाणे, उल्हासनगर महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत फेब्रुवारीअखेरीस संपत आहे. नवी मुंबईत भाजपचे १० पेक्षा अधिक नगरसेवक फोडून शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नवी मुंबईत एका बडय़ा राजकीय नेत्याने आपल्या खास समर्थकांसाठी बडय़ा उद्योग समूहाच्या रुग्णालयामार्फत हजारो लशी उपलब्ध करुन देण्याचा धडाका लावला आहे. हे इच्छुक उमेदवार जागोजागी मोफत शिबिरे भरवू लागले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक आणि नेते आपापले वजन खर्ची घालत बडय़ा रुग्णालयांकडून लस मिळवू लागले असून नवी मुंबईत येत्या आठवडाभरात ठिकठिकाणी अशी पाच शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.