ठाणे महापालिका आणि महाऊर्जा यांचा संयुक्त उपक्रम
शहरातील व्यावसायिक इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी जागृती व्हावी, तसेच शहरामध्ये पर्यावरणपूरक हरित इमारतींची निर्मिती व्हावी या उद्देशाने ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकारण (महाऊर्जा) यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ऊर्जा बचतीसंदर्भातील तांत्रिक माहिती उपस्थितांना देण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमहापौर राजेंद्र साप्ते, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, क्रेडाई एम.सी.एच.आय.चे अध्यक्ष सूरज परमार, इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन आर्किटेक्टच्या अध्यक्षा सुवर्णा घोष, महाऊर्जाचे संवर्धन विभागाचे व्यवस्थापक हेमंत पाटील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका महापौर आणि अतिरिक्त आयुक्त यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऊर्जा संवर्धनाच्या प्रयत्नांविषयी विवेचन केले. ‘एनर्जी कन्झव्‍‌र्हेशन बिल्डिंग कोड’ची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याचे प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला. २००१ च्या महाराष्ट्र ऊर्जा संवर्धन कायद्यानुसार ऊर्जा संवर्धन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाऊर्जा या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ऊर्जासंवर्धनविषयक उपक्रमाचा भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात बांधकाम क्षेत्रात दरवर्षी ८ ते ९ टक्के इतक्या मोठय़ा दराने वाढ होत आहे. या क्षेत्रात बांधकाम सुरू होण्यापूर्वीच ऊ र्जा कार्यक्षमता व ऊ र्जा संवर्धन योजनांचा समावेश केल्यास २५ ते ४० टक्के ऊर्जा बचत शक्य आहे. भारत सरकारच्या ‘ब्युरो ऑफ एनर्जी इफिशिअन्सी’ विभागाच्या वतीने व्यावसायिक इमारतींसाठी ‘एनर्जी कन्झव्‍‌र्हेशन बिल्डिंग कोड’ तयार करण्यात आला आहे. २००१ च्या ऊ र्जा संवर्धन कायद्यानुसार १०० किलोवॅट व अधिक विद्युतभार असणाऱ्या व्यावसायिक इमारतींना हा कोड बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे असे केल्यास राज्यातील बांधकाम क्षेत्रात प्रतिवर्षी एकूण १.७ द.ल. युनिट एवढी ऊर्जा बचत होणार आहे.
या ‘एनर्जी कन्झव्‍‌र्हेशन बिल्डिंग कोड’विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिकेने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power saving campaign