मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील अवजड वाहनांची कोंडी भेदण्यासाठी चाचपणी
किशोर कोकणे लोकसत्ता
ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील अवजड वाहनांची कोंडी भेदण्यासाठी येथे उन्नत मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून राज्य शासनाकडे धूळखात पडला आहे. मात्र, उ्शरा का होईना या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने पावले उचलली असून त्यासाठी राज्य शासनाने हा प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यानुसार या विभागाकडून लवकरच मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील वाहनांच्या वर्दळीचे नव्याने सर्वेक्षण करून त्याद्वारे उन्नत मार्ग उभारणीचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर उन्नत मार्ग उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.
उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पथकर भरावा लागत नसल्यामुळे अनेक अवजड वाहने याच मार्गावरून वाहतूक करतात. तसेच नवी मुंबई येथे मोठय़ा कंपन्यांची कार्यालये असल्याने हलकी खासगी वाहनेही याच मार्गावरून ये-जा करतात. यामुळे या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर एखादे वाहन बंद पडले तर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील वाहतुकीवर होतो. या पाश्र्वभूमीवर रेतीबंदर ते वाय जंक्शनपर्यंत मार्गाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने अभ्यास करून त्याआधारे येथे उन्नत मार्ग उभारणीचा प्रस्ताव २०१७ मध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. तसेच उन्नत मार्ग उभारणीसाठी या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१८ मध्ये तसे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये या मार्गावरून दिवसाला ३६ हजार वाहने वाहतूक करीत असून त्यात २० ते २५ हजार अवजड वाहनांचा समावेश असल्याचे समोर आले होते. मात्र, २०१७ मध्ये पाठविलेल्या या प्रस्तावावर राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे उन्नत मार्ग उभारणीचा प्रस्ताव केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे. असे असतानाच राज्य शासनाने आता उन्नत मार्ग उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील वाहतुकीचे नव्याने सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.
त्यानुसार मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील वाय जंक्शन ते रेतीबंदपर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीचे चित्रीकरण करण्यासाठी दोन कॅमेरे बसविले जाणार आहेत. या चित्रीकरणाद्वारे दररोज किती वाहनांची वाहतूक होते, याचा आढावा घेतला जाणार आहे. सुमारे महिनाभर हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. या उन्नत मार्गाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली तर मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील कोंडी सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वेक्षण अहवालात काय?
राज्य शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण अहवालात वाहनांच्या आकडेवारीसोबतच या ठिकाणी उन्नत मार्गाची कशी आवश्यकता आहे, हे सांगण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहने उन्नत मार्गावरून तर हलकी वाहने जुन्या मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू केल्यास वाहतुकीमध्ये किती फरक पडू शकतो, याबाबतही सर्वेक्षण अहवालात नमूद केले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
