डोंबिवली- दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. गटारे जागोजागी तुंबल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पावसाच्या पाण्याने तळे साचले आहे. सकाळ, संध्याकाळ मैदानात फिरणे, खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिक, खेळाडुंची कुचंबणा होत आहे.

यापूर्वी पाऊस सुरू होण्यापूर्वी मैदानातील खाचखळगे मातीने बुजवून २० एकरच्या मैदानात कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जात होती. अशाप्रकारचे नियोजन आता होत नाही. मैदानात विवाह सोहळे आणि इतर मनोरंजनाचे सार्वजनिक कार्यक्रम होतात. मंडप टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदले जातात. हे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरुन खेळाडूंचा पाया त्यात अडकून अपघात होतात, असे खेळाडुंनी सांगितले.रविवारी सकाळी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी माजी नगरसेवक रवी पाटील, नीलेश म्हात्रे, बंडू पाटील या मंडळींनी पहार आणून मैदानाभोवतीची गटारांची बुजलेली छिद्रे मोकळी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. ही जबाबदारी पालिकेची असताना क्रीडासंकुलाकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी खंत माजी नगरसेवक रवी पाटील यांनी व्यक्त केली.क्रीडागृहातील बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, महिला व्यायामशाळा बंद असल्याने खेळाडुंची कुचंबणा होत आहे. तरण तलाव सुरू आहे. पण तेथे स्वच्छता गृह ठीक नसल्याने महिला, पुरूषांची कुचंबणा होते.

हेही वाचा >>>कळवा ठाणे मार्गावर वाहनांच्या रांगा

डोंबिवलीतील एकमेव भव्य आकाराचे क्रीडासंकुल पालिकेला सुस्थितीत ठेवता येत नसल्याबद्दल माजी नगरसेवक पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. दररोज पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत नागरिक या भागात चालण्यासाठी येतात. खेळाडु मैदानाचा वापर सरावासाठी करतात. आता मैदानात पाणी तुंबले असल्याने फूटबाॅल, क्रिकेट इतर क्रीडा सराव करणाऱ्या खेळाडुंचे हाल होत आहेत.पालिका आयुक्तांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खेळाडुंकडून केली जात आहे. सावळाराम महाराज क्रीडासंकुलाची क्रीडाविषयक सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी आजीवन सदस्य म्हणून नोंदणी केली आहे. त्यांना दिलेल्या शुल्काच्या बदल्यात सुविधा मिळत नाहीत, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.