बदलापूर: गेल्या सहा महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे फक्त शेतकरीच हतबल झालेले नसून सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसला आहे. ही आपत्ती समजून तिला संधीत रूपांतरित करण्याची संकल्पना उराशी ठेऊन याच पावसातून जलसंधारणाचे कार्य बदलापूर जवळ यशस्वीरित्या करण्यात आले आहे. बदलापूर जवळील चामटोली येथे सहा हजार खड्ड्यांमध्ये तब्बल अडीच कोटी लिटर पाणी साठवण्यात आले आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात आला.
यंदा ऐन उन्हाळ्यात मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातील पश्चिम विक्षोभ, नंतर पूर्व मोसमी आणि मोसमी पावसाने पाच महिने गाजवले. सप्टेंबर महिन्यात पाऊस थांबेल आहे वाटत असताना ऑक्टोबर महिन्यातही पाऊस कोसळलाच. उत्तर मोसमी पावसाच्या सरी बरसल्याने ऐन दिवाळीत पाऊस पडत होता. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. शहरातही त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या. मात्र बदलापूरजवळ चामटोली येथे जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टच्या माध्यमातून यशस्वी जलसंधारण केले आहे.
ट्रस्टने चामटोली परिसरात सुमारे सहा हजार खड्डे अर्थात समांतर चर खणले. त्यात पावसाळ्यात तब्बल अडीच कोटी लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. या उपक्रमामुळे केवळ पाणी जमिनीत मुरले नाही, तर उल्हास नदीकडे जाणारा मोठा पाण्याचा प्रवाह थांबवून पूर नियंत्रणात महत्त्वाचे काम झाले. सतत पडणाऱ्या पावसाला दोष देण्यात अर्थ नाही, तर या परिस्थितीत विधायक काम केल्यास पूर नियंत्रण आणि पाण्याच्या तुटवड्यावर उपाय सापडू शकतो, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य गोळे यांनी दिली आहे. अडीच कोटी लिटर पाणी नदीपात्रात वाहून गेले असते, परंतु आता ते जमिनीत मुरवण्यात आम्ही यशस्वी झालो. या पद्धतीने काम सुरू ठेवले, तर उल्हास नदीची पूररेषा (रेड लाईन) नैसर्गिकरीत्या मागे जाईल आणि बदलापूरवासियांना पूर समस्येतून निश्चित दिलासा मिळेल, असेही आदित्य गोळे म्हणाले.
फायदा काय
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात पाणी नदीत जाण्यापासून वाचले. त्यामुळे तेवढाच गाळही थांबला. बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील कूपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. परिणामी, पिण्याचे आणि वापराच्या पाण्याचे प्रश्न सुटतील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाने या उपक्रमाकडे गांभीर्याने पाहून अशा योजना पुढे नेण्याची गरज आहे. या जलसंधारण उपक्रमामुळे पाण्याचे साठे पुनर्भरण, भूजलवाढ आणि पूरनियंत्रण या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे स्थानिक पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
