डोंबिवली – टाटा समूहाचा उलाढालीचा जगभर प्रचंड आवाका आहे. याच कोणतेही अवडंबर न माजविता उत्तम ग्राहक सेवा, सचोटी आणि प्रामाणिकपणाने सर्व व्यवहार हे टाटा समुहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. व्यवसाय करताना सामाजिक सेवेला या समूहात मोठे स्थान आहे. याच समूहाची ही परंपरा ज्येष्ठ उद्योजक दिवंगत रतन टाटा यांनी साधेपणातून जपली, अशी माहिती रतन टाटा यांचे यापूर्वीचे टाटा समूहातील विश्वासू सहकारी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित व्याख्यानात दिली.

श्री गणेश मंदिर संस्थानात टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, मधुमालती एन्टरप्रायझेस, सवाई ८३, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांंनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘रतन टाटा एक माणूस’ या विषयावर माधव जोशी यांनी रतन टाटा यांच्या सहवासातील अनुभव कथन केले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रतन टाटा यांचे बालपण, कौटुंबिक प्रवास, शिक्षण, नोकरी ते यशस्वी उद्योजक, त्यांचे श्वान प्रेम, आपले खास कौटुंबिक सेवेकरी अशा अनेक विषयांना स्पर्श करत जोशी यांनी सोप्या शब्दात रतन टाटा यांचा जीवन प्रवास उलगडला. पद्मविभूषण रतन टाटा यांना एक यशस्वी उद्योजक, दानशूर, नितीमान उद्योगपती म्हणून आपण ओळखतो. त्या पलीकडे रतन टाटा हे एक साधे, संवदेनशील आणि सहृदय माणूस होते. त्यांच्यामाधील साधेपणा, प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी श्रीमंती होती, असे जोशी यांनी सांगितले.

भागधारकांबरोबर समाज हिताचा विचार करणारा टाटा समूह आहे. त्याचे प्रत्यंतर रतन टाटा यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ला, करोना महासाथीच्या काळात दाखवून दिले. उदारीकरणाच्या धोरणाला देशी उद्योजकांनी विरोध केला. पण टाटा समूहाने त्याचे स्वागत करून उदारीकरणात टाटा समूह एकसंध राहील याची काळजी घेतली. व्यवसायातील सचोटीला तडा जाणार नाही याची काळजी त्यांनी वेळोवेळी घेतली. रतन टाटांचे श्वान प्रेम अफाट होते. घरात श्वान आजारी पडला आहे म्हणून त्यांनी मानाचा सन्मान नाकारला. आजही बाॅम्बे हाऊसमध्ये पाळीव, भटक्या श्वानांसाठी मोकळे, ऐषआरामी वातावरण आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

रतन टाटा यांची कार्यालयातील दालने अतिशय साधी होती. एवढ्या मोठ्या उद्योजकाचे एवढेसे दालन अशी कधी मनाला खंत वाटायची. रतन टाटा यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. कार्यालयीन वेळेनंतर चालकाचे साहाय्य न घेता रतन टाटा स्वता कार चालवित अतिथींच्या भेटीसाठी ताज हाॅटेलपर्यंत निर्धास्तपणे जात होते. हे दृश्य पाहताना अनेकांना धक्का बसत असे. ते डावखुरे होते. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा छंद होता. फावल्या वेळेत ते क्रिकेटमध्ये व्यस्त असत. खडतर मेहनत, कष्ट करून रतन टाटा यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली होती. त्यामुळे व्यवसायातील बारकावे त्यांच्या झटकन निदर्शनास येत होते. जगभरातील गॅजेट्स त्यांंच्या संग्रहात होती. वेळ मिळेल तेव्हा ते त्याचे वाचन करत, असे जोशी यांनी सांगितले.