अंबरनाथः गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जलमय झाली आहेत. शहरातील जवळपास सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचले. शहरातील कल्याण बदलापूर राज्यमार्ग, फॉरेस्ट नाका ते बदलापूर शहराचे प्रवेशद्वार या महत्वाच्या रस्त्यांवर एक फुटांपर्यंत पाणी साचले होते. तर टी जंक्शन चौक, अंबरनाथचे आनंदनगर येथील प्रवेशद्वारावर खड्ड्यांमुळे कोंडी होते होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शहरातील दोन्ही उड्डाणपूल खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचे केंद्र ठरते आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात संततधार पाऊस पडतो आहे. त्यातच सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याचा फटका अनेक शहरांना बसला. सोमवारी सकाळच्या सुमारास भरलेल्या शाळा दुपारी चारनंतर सोडून देण्यात आल्या. तर पावसाचा अंदाज पाहून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मंगळवारी रात्रभर आणि सकाळपासून पावसाचा मोठा जोर पाहायला मिळाला. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ नोंदवली गेली.
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर अधूनमधून वाढत होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत होते. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीणचा भाग, कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग परिसर, अंबरनाथ ग्रामीण मध्ये जोरदार पावसामुळे नैसर्गिक नाले भरून वाहत होते. उल्हास नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या नाल्यांत मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले होते. बदलापूर शहरातील आशिर्वाद हॉस्पीटल परिसरात पाणी साचले होते. रमेशवाडीच्या नदीकडे असलेल्या सखल भागात रस्त्यावर पाणी आले होते.
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यातून वाहनचालक मार्ग काढत होते. पुढे फॉरेस्ट नाका ते बदलापूर शहराचे प्रवेशद्वारापर्यंत बदलापुरकडे येणाऱ्या मार्गिकेवर पाणी साचले होते. येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे हे पाणी रस्त्याच्या एका बाजुने दुसऱ्या बाजूला वाहत होते. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. याच रस्त्यावर असलेल्या अंबरनाथ पालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांमधून पाणी वर येत असल्याने दुचाकीस्वारांना त्याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. काटई मार्गावरील टी जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने येथून जाताना वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता.
अंबरनाथ, उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाणी पातळीतही मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे वालधुनी नदीचे पाणी शिव मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले होते. वालधुनी नदी किनारी असलेल्या सखल भागातही पाणी शिरत होते. कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर म्हारळजवळ सखल रस्त्यावर पाणी आल्याने वाहनांची कोंडी होत होती. येथून पादचाऱ्यांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत होती.