ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका परिसरात चाकू आणि खेळण्यातील बंदूकीचा धाक दाखवून १३ लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन कळवा पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली. तर त्यांच्या इतर दोन साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ५ लाख २५ हजार ८५० रुपये जप्त केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फैजानअली अन्सारी (४१), विवेक वाघमोडे (२२) आणि मयुर पाटील (२२) असे आरोपींची नावे आहेत. भिवंडी नाशिक मार्गालगतच्या मिल्लत नगर परिसरात ५१ वर्षीय फळ विक्रेते राहतात. १२ फेब्रुवारीला ते भिवंडी येथून वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होते. ते मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका परिसरात आले असता, चार दरोडेखोर तेथे आले. त्यांनी दोन दुचाकीने फळ विक्रेता प्रवास करत असलेल्या रिक्षाचा पाठलाग केला. त्यानंतर मुंब्रा येथे जाणाऱ्या मार्गिकेवरील एका निर्जनस्थळी त्यांना गाठले. त्यानंतर चाकू आणि रिव्हाॅल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडील १३ लाख रुपये घेऊन निघून गेले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, यांनी पोलीस निरीक्षक विठ्ठल नावडे, अनिल गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोडे, पोलीस हवालदार वैभव जोशी, प्रदीप शिंदे, महादेव हजारे, जगदीश न्हावळदे, स्वप्नील खपाले, उदय कोरे, पोलीस नाईक बुधे, माळी यांच्या पथकाला तापासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार अमलदारांनी घटनास्थळ, मुंबई नाशिक महामार्गावर तसेच इतर परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण पथकांनी तपासले. तसेच साक्षीदाराकडून आणि खबऱ्यांमार्फत माहिती गोळा करून तांत्रिकदृष्ट्या तपास सुरु केला. त्यावेळी फैजानअली अन्सारी याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला भिवंडी येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आणखी चार साथिदारांच्या मदतीने हा दरोड्याचा कट रचल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी त्याचे दोन साथिदार विवेक वाघमोडे, मयुर पाटील यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार ८५० रुपयांची रोकड जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी देखील जप्त केल्या. खेळण्यातील बंदूक वापरून त्यांनी हा प्रकार केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbers arrested for robbing passenger of rs 13 lakh using toy gun zws