कल्याण – कल्याणमध्ये येथे राहत असलेले रेल्वे सुरक्षा दलातील जवान दुचाकीवरून कल्याण रेल्वे स्थानक येथे गेल्या आठवड्यात जात होते. यावेळी एका मोटारातील एका प्रवाशाने मोटारीचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने त्या दरवाजावर जवानाची दुचाकी आपटून ते गंभीर जखमी झाले. त्यांना मदत करण्याऐवजी मोटारीतील तीन जणांनी आरपीएफ जवानाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नीलेश अभिमान चौधरी (४१) हे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे नोकरी करतात. ते कल्याण पश्चिमेतील भवानीनगर भागात कुटुंबीयांसह राहतात. ते कामावर जाण्यासाठी घर ते कल्याण रेल्वे स्थानक दुचाकीचा वापर करतात. गेल्या आठवड्यात आरपीएफ जवान नीलेश चौधरी आपल्या दुचाकी गाडीने मुरबाड रस्ता येथून कल्याण रेल्वे स्थानकाकडे येत होते. त्यांची दुचाकी मुरबाड रस्त्यावरील मध्य रेल्वेच्या शाळेसमोरून जात होते. त्यावेळी शाळेसमोरील प्रवेशव्दारावर एक मोटार उभी होती.

ही मोटार उभी असल्याने त्या वाहनाला मागे टाकून चौधरी दुचाकीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मोटारीच्या मागील आसनावर बसलेल्या एका प्रवाशाने अचानक दरवाजा उघडला. त्यावेळी काही कळण्याच्या आत चौधरी यांची दुचाकी मोटार कारच्या दरवाजाला धडकून ते जोराने जमिनीवर पडले. त्याच्या डोक्याला, पाय, हाताला दुखापत झाली. रक्तस्त्राव सुरू झाला होता. चौधरी यांनी आपणास तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे म्हणून मोटारीतील तीन जणांना विनंती केली. त्यावेळी एकाने आम्ही तुम्हाला जखमेवर बांधण्याची पट्टी आणून देतो असे सांगितले. जवान चौधरी आपणास रक्तस्त्राव सुरू झाला आहे. वेदना होत आहेत. आपल्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे असे सांगून मोटारीतील ३० ते ४५ वयोगटातील प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी मोटारीतील इतर दोन जण पुढे आले त्यांनी चौधरी यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना शिवागीळ सुरू केली. आपणास जखम झाली आहे. आपण मला कशासाठी शिवीगाळ करता असे चौधरी बोलत असताना मोटारीतील तिघांनी मिळून चौधरी यांना बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर घडल्या अपघाताची स्थानिक पोलीस ठाणे किंवा अन्य कोणाला माहिती न देता आपणास रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य न करता मोटारीतील तीन जण मोटारीसह पळून गेले. म्हणून आपण मोटार वाहन क्रमांक एमएच ०५ एफजी ५९८१ वाहन मालक, चालका विरुध्द तक्रार देत आहोत, असे नीलेश चौधरी यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.