Thane Municipal Corporation Election 2025 / ठाणे : येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांकडून राजकीय पक्षांनी अर्ज भरून घेण्यास सुरूवात केली आहे.
अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही ठाण्यात उमेदवारी अर्ज भरून घेण्यास सुरूवात केली असून यात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच जितेंद्र आव्हाडांच्या एकेकाळच्या समर्थकाविरोधात त्या निवडणूक लढणार आहेत.
ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणूक विभागानेच प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच आरक्षण प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते इच्छुक असून या इच्छूकांकडून पक्षाच्या नेत्यांनी अर्ज भरून घेण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरुवातीला कळवा, मुंब्रा, विटावा, ठाणे शहर, घोडबंदर, वागळे, कोपरी, पांचपाखाडी या भागातील सुमारे ७३ जणांनी आपले अर्ज ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केले होते. अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरूण आणि महिलांची संख्या मोठी आहे. दहा तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून ते प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची लवकरच नावे जाहीर करण्यात येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हटले होते.
मिलींंद पाटील यांच्याविरोधात लढणार
इच्छूक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. त्या कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. या प्रभागाचे नेतृत्व माजी नगरसेवक मिलींद पाटील हे करतात. पाटील हे एकेकाळचे जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी आव्हाड यांची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. ही बाब आव्हाड यांच्या जिव्हारी लागली होती. तसे त्यांनी भाषणातून अनेकदा बोलून दाखविले होते. यातच आता ऋता आव्हाड यांनी पाटील यांच्या प्रभागातून निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणुक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
कोण आहेत ऋता आव्हाड
ऋता आव्हाड या कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत. ऋता आव्हाड या दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांचे बंधू दादा सामंत यांची मुलगी आहे. त्यामुळे घरातूनच त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळालेले आहे. दत्ता सामंत यांनी ठाण्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढविली होती.
जितेंद्र आव्हाड यांचे वडील आणि दत्ता सामंत यांची मैत्री होती. त्यामुळे लोकसभेच्या प्रचारासाठी ऋता आव्हाड या ठाण्यात यायच्या, तेव्हा त्या आव्हाड यांच्या घरी जात असत. यातूनच जितेंद्र आव्हाड आणि त्यांची ओळख होऊन पुढे त्यांचे लग्न झाले. त्यांनी काही काळ कोरस कंपनीतही नोकरी केली. पुढे १९८६ मध्ये त्या एअर होस्टेस झाल्या. २०१४ साली त्यांनी ही नोकरी सोडली. तसेच संघर्ष महिला संघाच्या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत
