ठाणे : कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांनी कबड्डी खेळाचे नाव देश पातळीवर उंचावले. पण, या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केवळ शरद पवार यांनी केले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना काढले. राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणारे तटकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे शनिवारी कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जयंतीनिमित्त २३ वा कबड्डी दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. कबड्डी खेळाचा आशिया स्पर्धेत समावेश झाला तर या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार होता. ही बाब लक्षात घेऊन शरद पवार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या खेळाचा आशिया स्पर्धेत समावेश झाला. त्यामुळे या खेळात शरद पवार यांचे योगदान महत्वाचे आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांनी कबड्डी खेळाचे नाव देश पातळीवर उंचावले. पण, या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केवळ शरद पवार यांनी केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कबड्डी हा खेळ सांघिक आहे आणि त्यात एक विश्वास दिसून येतो. या खेळात पकड, चढाव असे अनेक बारकावे असतात. कबड्डी सारखी सांघिक खेळ राजकारणातही पहावयास मिळतो, असेही ते म्हणाले. इतर खेळाप्रमाणे कबड्डी खेळासाठी इनडोअर स्टेडियम उभारण्यात यावेत आणि या खेळाडूंना नोकरीची संधी मिळावी. तसेच जायबंदी होणाऱ्या खेळाडूंना विमा संरक्षण मिळावे, असे मत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
ठाण्याचा पठ्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात. त्यामुळे त्याला मी जास्त महत्व देत नाही. तसेच आनंद परांजपे यांचे संघटनेत तर नजीब मुल्ला यांचे पालिकेत चांगले काम आहे. परंतु कुणाच्या तरी आडकाठी भूमिकेमुळे त्यांच्या कर्तुत्वाला वाव मिळाला नाही. पण, आता त्यांच्या कर्तुत्वाला वाव मिळेल, असे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.