कल्याणमधील शिवगर्जना मेळाव्यातील प्रकार

कल्याण- येथील शिवगर्जना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाच्च भाषेत शेरेबाजी करत त्यांना अर्वाच्च भाषेत भाषणातून शिवीगाळ करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला मुंबई संघटक राजुल पटेल यांच्या विरुध्द शिंदे गटाच्या समर्थक छाया वाघमारे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तातडीने तपास सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, विकासकामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा गुरुवारी दुपारी कल्याण पश्चिमेतील महावीर सभागृहात शिवगर्जना अभियानांतर्गत शिवगर्जना मेळावा होता. या मेळाव्यासाठी ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे पक्षाच्या मुंबई महिला संघटक राजुल पटेल उपस्थित होत्या. राजुल पटेल यांनी भाषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत, अर्वाच्च भाषेत त्यांना जाहीरपणे शिवीगाळ केली. कौटुंबिक पातळीवरुन पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> रस्ते सफाई कामाची गुणवत्ता सुधारली नाही तर नवे ठेकेदार नेमणार; ठाणे महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा

अश्लिल आणि अर्वाच्च भाषेतील राजुल पटेल यांच्या भाषणाची ध्वनी दृश्यचित्रफित तात्काळ समाज माध्यमांवर प्रसारित झाली. ही चित्रफित शिवसेना कल्याण शहर शाखा या व्हाॅट्सप ग्रुपवर आली. ही ध्वनीचित्रफित शिंदे समर्थक, कल्याण शहर जिल्हा संघटक छाया वाघमारे यांनी ऐकली. त्यांना राजुल पटेल यांनी व्यासपीठाचे सर्व संकेत तुडवून, सार्वजनिक ठिकाणी उच्चपदस्थांविषयी काय बोलायचे याचे भान सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी भाषण केल्याचे दिसले. संघटक वाघमारे यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात महावीर सभागृहात राजुल पटेल यांनी केलेल्या भाषणाची ध्वनी दृश्यचित्रफित पोलीस अधिकाऱ्यांना ऐकवली. पटेल यांच्या विधानांमुळे उच्चपदस्थ आणि सांविधानिक पदाच्या लौकिकाला बाधा पोहचली आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली आहे. दोन गटात तेढ, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल वाघमारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ठाकरे समर्थक मुंबईच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group filed complaint against former corporator rajul patel for abusing cm eknath shinde zws