ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या ठाण्यातील शंभर वर्षे जुन्या स्पोर्टींग क्लब कमिटीच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे असा सामना रंगल्याचे चित्र होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागांवर विजय मिळवत बाजी मारली. तर, भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. राजेश मढवी यांच्या स्पोर्टींग कार्यशील पॅनेलने नऊपैकी चार जागांवर विजय मिळविता आला आहे. त्यामुळे स्पोर्टींग क्लब कमिटीत शिंदेच्या शिवसेनेचे वर्चस्व मिळवले आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणुक शुक्रवार, १९ सप्टेंबरला सेंट्रल मैदावरील क्लबच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकीत १८ उमेदवार उभे होते. तर, क्लबचे १५७ सदस्य मतदान करून ९ कार्यकारिणी सदस्यांची निवड करणार होते. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २४ उमेदवारांनी आपले निवडणुक अर्ज दाखल केले होते. परंतु नावे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते. विसर्जित कार्यकारिणीतील ९ पैकी ८ सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

स्पोर्टींग कार्यशील पँनेलमधून भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. राजेश मढवी, शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी सचिन गोरीवले, मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे हे एकत्रितपणे निवडणुक लढवित होते. त्याच्याविरोधातील स्पोर्टींग क्लब पँनलमधून शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी परिवहन सभापती विलास जोशी हे निवडणुक लढवित होते. त्यांच्या पॅनलमधून यापुर्वी भाजपचे पदाधिकारी प्रशांत गावंड यांनी निवडणुक लढविले होती. यंदाही ते रेपाळे यांच्या पॅनलमधून निवडणुक लढणार होते. मात्र, अचानकपणे त्यांनी माघार घेतली होती. यामुळे या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे असा सामना रंगल्याचे चित्र होते.

शिंदेच्या सेनेचे वर्चस्व

१ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२८ या कालखंडाकरता झालेल्या निवडणुकीत ९६ टक्के मतदान झाले. संस्थेच्या एकूण १५८सदस्यांपैकी १४३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकरा सदस्य गैरहजर राहिले तर तीन मते बाद झाली. मतदान करणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, डॉ संजीव नाईक यांचा समावेश होता. या अटीतटीच्या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनेलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, ॲड कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले.

तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉ. राजेश मढवी, सचिव दिलीप धुमाळ, अतुल फणसे, डॉ योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या. दरम्यान, स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे. ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे भरीव योगदान आहे. पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी सांगितले.

मतनिहाय विजयी उमेदवार

डॉ राजेश मढवी (९२), विकास रेपाळे (८४), दिलीप धुमाळ (८२), विलास जोशी (८२), श्रावण तावडे (८२), ॲड कैलास देवल (८०), किरण साळगावकर (७५), अतुल फणसे (७०), डॉ योगेश महाजन(६९).