अंबरनाथः अंबरनाथमध्ये सत्ताधारी शिवसेनेत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच त्यांच्या पक्षाला आणि कुटुंबाला धक्का बसला आहे. अरविंद वाळेकर आणि मनिषा वाळेकर यांचा पुतण्या पवन वाळेकर यांनी आई शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर यांच्यासह भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील आमदार किणीकर गटाचे ते निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते आहे.

अंबरनाथ महापालिकेत नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर या अधिकृत उमेदवार आहेत. अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी कीणीकर यांच्यातील जुना वाद सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीतही या वादाची तीव्रता दिसून आली होती.

वाळेकर गटातील काही कार्यकर्त्यांनी किणीकर यांच्या विरोधात काम केल्याचा आरोपही झालेला होता. आता माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे आमदार बालाजी किणीकर प्रचारात कशा पद्धतीने सहभागी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष धगधगता होता. त्यापूर्वीच आमदार किणीकर यांनी वाळेकर कुटुंबातील पवन वाळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेनेत मानाचे स्थान देण्यास सुरूवात केली. त्यामुळे वाळेकर समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. तर पवन वाळेकर यांनी विधानसभा निवडणुकीत किणीकर यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे हे कुटुंबातील मतभेद आणखी तीव्र झाले होते.

आता, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खुंटवली प्रभागातील तिकीट वाटपावरून काका–पुतण्यात संघर्ष समोर येत असतानाच पवन वाळेकर यांनी अचानक पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आई, शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर, तसेच युवासेना पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्यासोबत प्रवेश घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

खुंटवली परिसर हा वाळेकर कुटुंबाचा पारंपरिक मजबूत बालेकिल्ला मानला जातो. पवन वाळेकरांच्या प्रवेशामुळे या भागात भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, काका अरविंद वाळेकर यांच्या समर्थकांची कोणती प्रतिक्रिया येणार, तसेच शिवसेनेतील विरोधी गटाकडून पवन वाळेकरांना छुपा पाठिंबा मिळतो का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. वाळेकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि विविध गटांमधील सत्तासंघर्ष तापणार हे निश्चित झाले आहे.

किणीकर समर्थक भाजपात कसे ?

ज्या आमदार किणीकर यांनी पवन वाळेकर यांना शिवसेनेत स्थान देत त्यांच्या मातोश्री मीनाताई वाळेकर यांना जिल्हा संघटकपद दिले होते. त्या किणीकरांना सोडून भाजपात प्रवेश केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना किंवा किणीकर गट त्यांना रोखण्यात अपयशी ठरले का असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.