कल्याण पश्चिमच्या उमेदवारीवरून खेचाखेची; दोन उमेदवारांना ‘एबी’ अर्ज देण्याची खेळी अंगलट येण्याची शक्यता

सावध खेळी म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांना पक्षाचा ‘एबी’ अर्ज देण्याची रणनीती शिवसेनेच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. ‘एबी’ अर्ज मिळाल्याने विद्यमान आमदार सुभाष भोईर आणि डोंबिवलीचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे या दोघांनीही पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, म्हात्रेंचा अर्ज भरताना यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहिल्याने या मतदारसंघातून भोईर यांना डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे; परंतु भोईर यांनीही गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘मीच निवडणूक लढवणार’ असे सांगितल्याने या मतदारसंघातील तिढा वाढला आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना पुन्हा उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विरोध होता. भोईर यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार न करण्याचा इशारा २७ गाव परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला होता. ठाणे महापालिकेतील उपमहापौर आणि दिव्यातील शिवसेनेतील बडे प्रस्थ रमाकांत मढवी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भोईर यांच्या नावाला विरोध केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य वाढले. मात्र, युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख यांनी सुभाष भोईर यांना ‘एबी’ अर्ज सुपूर्द केला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनाही ‘एबी’ अर्ज देण्यात आला. भोईर यांना कल्याण पश्चिमऐवजी कळवा-मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी देण्याचा विचार शिवसेना पक्षश्रेष्ठींनी चालवला होता. मात्र, भोईर यांनी बुधवारीच अर्ज दाखल करून पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले, तर रमेश म्हात्रे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला.

म्हात्रे हे अर्ज भरत असताना खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहिल्याने त्यांची उमेदवारी अधिकृत असेल, असे मानले जात आहे. भोईर यांच्या उमेदवारीला श्रीकांत शिंदे यांचाही विरोध असल्याचे सांगण्यात येते. मात्र, भोईर यांनी ‘पक्षाने मलाच उमेदवारी दिली असून म्हात्रे यांनी कशाच्या जोरावर अर्ज दाखल केला याची मला कल्पना नाही’ अशी प्रतिक्रिया देऊन आपला दावा कायम असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, गुरुवारी सायंकाळी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘मीच निवडणूक लढवणार’ असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला अधिकारपत्र उमेदवारी अर्ज दिला आहे. आपण पाच वर्षांत केलेली विकासकामे, त्याची पक्षप्रमुखांपर्यंत घेतलेली चांगली दखल म्हणून शिवसेनेच्या पहिल्या यादीत उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता कोण काय बोलतोय याच्यापेक्षा मी प्रचारावर भर देणार आहे. – सुभाष भोईर, शिवसेना उमेदवार, कल्याण ग्रामीण