उल्हासनगरः सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येने हादरलेल्या उल्हासनगरमध्ये आता राजकीय पातळीवर भूमिका घेतली जाते आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाने पोलिस प्रशासनाची भेट घेतली. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रकरणाची फेर चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीतील ठाकरे गटाचे शिष्टमंडळ परिमंडळ – ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल कोळी यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देऊन सत्य परिस्थिती उघडकीस यावी, कोणताही निर्दोष व्यक्ती अडकू नये, यासाठी सखोल तपासाची मागणी करण्यात आली.

दहा दिवसांपूर्वीची धक्कादायक घटना

सुमारे दहा दिवसांपूर्वी कॅम्प ४ मधील रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून सरिता खानचंदानी यांनी उडी घेत आत्महत्या केली होती. खानचंदानी या वकिल होत्या. सोबतच त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. हिराली फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणात अनेक कार्यक्रम हाती घेतले होते. तसेच ध्वनी प्रदुषण, जल प्रदुषण, रस्ते अडवून केले जाणारे उत्सव अशा विविध विषयांवर त्यांचा लढा सुरू होता. आत्महत्येपूर्वी त्यांचा एका महिलेशी वाद सुरू असल्याच्या चित्रफिती प्रसारीत झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आत्महत्या केली. या अगोदर त्यांनी आपल्या नोंदवहीत चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिल्यानंतर त्याआधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांची नावे समाविष्ट होती, अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती.

बोडारे यांना जाणूनबुजून फसवले – ठाकरे गट

आमचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा सरिता खानचंदानी यांच्याशी काहीही संबंध नसताना त्यांना या प्रकरणात जबरदस्तीने ओढले गेले आहे. खरे आरोपी कोण असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, याला आमचा विरोध नाही. मात्र निष्पाप व्यक्तींना गुंतवले जाणार नाही याची खबरदारी घेणे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

या निवेदनावेळी उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

या प्रकरणाच्या फेरचौकशीची मागणी ठाकरे गटाने केली असून, पुढील काही दिवसांत यावरून राजकीय वर्तुळात आणखी हालचाली होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्यातील या संवेदनशील प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.