डोंबिवली : सण, उत्सवांच्या काळात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या डोंबिवली फ प्रभागाने आपल्या प्रभागातील दुकाने, खासगी आस्थापना, रस्त्यावरील विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. फ प्रभाग हद्दीतील बाजारपेठ विभागात अचानक भेटी देऊन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दुकानात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांना दंड ठोठावला.

तसेच, प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला. डोंबिवली पूर्व फडके रस्ता, नेहरू रस्ता, शिवमार्केट, चिमणी गल्ली आणि अंतर्गत रस्त्यांवरील दुकाने हा फ प्रभागातील परिसर बाजारपेठेचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक नागरिकांच्या हातांमध्ये सामान असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून येत असल्याचे फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे काही दुकानदार सर्रास या प्रतिबंधित पिशव्यांचा वापर करत असावेत असे लक्षात आल्याने. या पिशव्या दुकानदार कोणत्या प्लास्टिक वस्तू विक्री दुकानातून खरेदी करतात याची माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी काढली. काही दुकानदारांनी प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू विक्री करणाऱ्या दुकान आणि व्यापाऱ्यांची नावे मुंबरकर यांना सांगितली.

या माहितीप्रमाणे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी कारवाई पथक घेऊन प्लास्टिक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये अचानक भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना दुकानाच्या दर्शनी भागात प्रतिबंधित प्लास्टिकचे गठ्ठे आढळले. शासन नियमाप्रमाणे अशाप्रकारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणे कायद्याने गु्न्हा आहे हे माहिती असुनही आपण या पिशव्या का विकता, असे प्रश्न मुंबरकर यांनी दुकानदाराला केले. आपण प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विकता त्यामुळे बाजारात या पिशव्या अधिक प्रमाणात विक्रेते, ग्राहक वापरतात, अशा कानपिचक्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी संबंधित दुकानदाराला दिल्या.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या म्हणून संबंधित दुकानदाराला पाच हजार रूपयांचा दंड पथकाने ठोठावला. अशाच पध्दतीने बाजारपेठेतील इतर दुकानांमध्ये गेल्यावर कारवाई पथकाला तेथेही प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या दुकानदारावरही पाच हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. आणि पु्न्हा अशाप्रकारे प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू, पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या तर फौजदारी कारवाई केली जाईल, अशी तंबी दुकानदारांना देण्यात आली.

सण, उत्सव काळात फूल, फळे घेण्यासाठी ग्राहका जवळ पिशव्या नसल्या की विक्रेते आपल्या जवळील प्रतिबंधित प्लास्टिकची पिशवी ग्राहकाला वस्तू ठेवण्यासाठी देतात. अनेक वेळा रस्त्यावरील फळ, फूल विक्रेते आपल्या जवळील आसनाखालील बैठकीखाली प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या लपून ठेवतात. ग्राहकाने पिशवीची मागणी केली मग या विक्रेत्या आजुबाजुला पालिकेचा कर्मचारी नाही पाहून पटकन ग्राहकाला प्रतिबंधित पिशवी देत असल्याचे कल्याण, डोंबिवली परिसरातील चित्र आहे.

फ प्रभाग हद्दीत आता आपण नियमित प्रतिबंधित प्लास्टिक ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार आहोत. यासाठी विशेष कारवाई पथक दररोज बाजारात फिरणार आहे, असे साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.