कल्याण – कल्याण पश्चिमेत हाॅटेल संतोष परिसरात एका महिला गायिकेला भरधाव वेगात असलेल्या मोटारीने उडविल्याने गायिका गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी गायिकीने कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

भावना शिवानंंद चितळे असे या गायिकेचे नाव आहे. त्या डोंबिवली पूर्व दावडी परिसरात राहतात. कल्याणमधील एका हाॅटेलमध्ये त्या गायिका म्हणून नोकरी करतात. हा अपघात कल्याण पश्चिमेतील संतोष हाॅटेल समोरील रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

तक्रारदार भावना चितळे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपला हाॅटेलमधील गायनाचा कार्यक्रम उरकून आपण सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान संतोष हाॅटेल समोरील रस्त्यावरून पायी चालले होते. आपण रस्त्यावरून येणारी वाहने बघून रस्ता ओलांडत होतो. रस्ता ओलांडत असताना समोर वाहन नाही हे पाहून रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात असलेली एक सेलोरिया मोटार कार आली. मोटार कार चालकाने रस्त्याच्या बाजुला असताना वेगाने आपणास ठोकर दिली. या धडकेत आपण रस्त्यावर पडलो. आपणास गंभीर दुखापत झाली. रात्रीची वेळ होती. त्यामुळे तात्काळ मदतीला कोणी धाऊन आले नाही.

ठोकर दिल्या नंतर मोटार कार चालकाने आपणास तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी साहाय्यक करणे आवश्यक होते. याऊलट कार चालकाने आपली मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून तो तेथून पळून गेला. आपण मदतीसाठी धावा करत असताना अपघात करणाऱ्या कार चालकाने आपणास अजिबात साहाय्य केले नाही. त्यामुळे आपण संबंधित कार चालका विरुध्द तक्रार करत आहोत, असे तक्रारदार भावना चितळे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे हवालदार बांगर याप्रकरणाचा तपास करत आहेत.

अपघात करणाऱ्या मोटार कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मोटार कार चालकाने महिलेला जोराची ठोकर दिली त्यावेळी कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. कार चालकाने मद्य सेवन केले होते का, अशा अनेक बाजुने पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पोलीस तपासून पाहत आहेत. अलीकडे रात्रीच्या वेळेत अपघात करणारे बहुतांशी चालक हे मद्य सेवन केलेले असतात, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.