Bhiwandi Crime : भिवंडीत एका खुनाच्या गुन्ह्यात तब्बल दहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपीचा शोध त्याच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे लागला. पोलिसांनी त्या आरोपीला इंदौरमधून अटक केली असून राजू महेंद्र सिंग (२२) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिसांकडून देण्यात आली.
भिवंडीत एकतर्फी प्रेमातुन राजू याने एका मुलीची हत्या केल्याचा प्रकार ऑक्टोबर २०२४ रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी शांतीनगर पोलिस गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतू, मुख्य आरोपी राजू हा फरार होता. आरोपी राजू हा उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील असल्याने पोलिसांनी दोन वेळा त्याच्या मूळ गावी जाऊन त्याचा शोध घेतला होता. परंतू, तो तेथे गुन्हा घडल्यापासून आलाच नाही आणि त्याचा मोबाईल देखील तेव्हापासून बंद असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर, गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, हा आरोपी उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे आला आहे. त्यावेळी पोलिसांचे पथक प्रयागराजला रवाना झाले. पोलिसांनी प्रयागराजमध्ये गेल्यावर तांत्रिकपद्धतीने त्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मध्यप्रदेशमधील इंदौर मध्ये असल्याचे समजले.
त्यावेळी पोलीसांना समजले की आरोपीचा मोठा भाऊ हा ट्रकचालक आहे. तो देखील इंदौर येथील देवासनाका येथे आहे याची माहिती मिळाली. त्यावेळी आरोपी हा त्याच्या भावासोबत असल्याचा संशय पोलिसांना आला.
असा लागला आरोपीचा शोध
आरोपी इंदौर येथेच असल्याचा संशय येताच, तत्काळ पोलीस पथकातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांनी इंदौर क्राईम ब्रँच येथे त्यांच्या परिचयाचे पोलीस उपनिरीक्षक यांना संपर्क करून आरोपीचा फोटो पाठविला. त्यांनी ताबडतोब त्यांच्या पोलीस पथकाला सदर ठिकाणी पाठवून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनी सदर भागात आरोपीचा कसून शोध घेतला असता, हा आरोपी त्यांना सापडला. आरोपीने इंदौर क्राइम ब्रांच पोलिसांना आपली ओळख लपवुन सुरज असे चुकीचे नाव सांगितले होते. परंतू आरोपीच्या हातावर टॅटू असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी इंदौर पोलिसांना दिली होती. त्यावेळी इंदौर पोलिसांनी खात्री करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या हातावर टॅटू आहे का हे तपासले असता, त्याच्या हातावर टॅटू आढळून आला. त्यानंतर या आरोपीला ताब्यात घेवून शांतीनगर पोलीस ठाणे येथे आणले. शांतीनगर पोलिसांनी या आरोपीला अटक केले. या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.