कल्याण – ठाणे जिल्ह्यातील १०४ माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी अकरा वाजता ठाण्यात टेंभी नाका येथील बी. जे. हायस्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याच्या विविध भागातील मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक मंगळवारी सकाळी दहा वाजताच ठाण्यातील नियोजित शाळेत हजर झाले. पण, तेथील कार्यक्रम रद्द झाल्याचे समजल्यावर शिक्षकांचा हिरमोड झाला.
समायोजनाचा कार्यक्रम रद्द करायचा होता तर माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. पण अशाप्रकारचा कोणताही निरोप माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आला नसल्याचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, भांडुप, बेलापूर, ठाणे, मुंब्रा भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या वर्गांचे शिक्षक, मुख्याध्यापक या समायोजन प्रक्रियेसाठी मंगळवारी सकाळीच ठाण्यात हजर झाले होते.
ही प्रक्रिया मंगळवारी होणार नव्हती. तर माध्यमिक शिक्षण विभागाने रात्री किंवा सकाळीच तसे निरोप शिक्षकांना पाठविले असते तर शिक्षकांना ठाणे येथे सकाळच्या लोकल, बस गर्दीतून येण्याचा त्रास वाचला असता अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. या प्रक्रियेमुळे अनेक शिक्षकांनी शाळेत जाण्याचे टाळले. समायोजन प्रक्रियेचा कार्यक्रम रद्द झाल्याचे समजल्यावर शिक्षकांनी घटनास्थळी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी तेथील एका लिपिकाने अशाप्रकारचे निरोप शिक्षकांना कळविले होते, असा पवित्रा घेतला. शिक्षकांनी ते मान्य केले नाही.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी पत्रात म्हटले आहे, जिल्ह्यातील १०४ माध्यमिक शाळांना पत्र पाठवून सन २०२३-२०२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन संस्थांतर्गत शाळांमध्ये करून उर्वरित रिक्त, अतिरिक्त पदांची माहिती शिक्षण विभागाला देण्याचे कळविले होते. अशा शाळांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर संचमान्यतेप्रमाणे त्या शिक्षकांचे समायोजन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आले. यानंतर शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त, उर्वरित शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंगळवारी समायोजन प्रक्रियेचा कार्यक्रम ठाण्यातील बी. जे. हायस्कूलमध्ये होणार आहे.
या समायोजन प्रक्रियेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक, शिक्षक समायोजन प्रक्रियेसाठी ठाण्यात दाखल झाले होते. अनेक शिक्षक शहरी भागातील शाळांवर नोकरी करत असले तरी ते शहापूर, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबई ग्रामीण पट्ट्यात राहतात. त्यांची सर्वाधिक ही प्रक्रिया रद्द झाल्याने ओढाताण झाली. कार्यक्रमस्थळी आल्यावर समायोजन प्रक्रिया रद्द झाल्याचे समजल्यावर शिक्षकांनी शिक्षण विभागाकडून इतर अत्यावश्यक सेवेचे लघुसंदेश मुख्याध्यापक, शिक्षक व्हाॅट्सपग्रुपवर पाठविले जातात, मग मंगळवारची समाजयोजन प्रक्रिया रद्द करण्याचा लघुसंदेश टाकण्यात टाळाटाळ का करण्यात आली, असे प्रश्न शिक्षक करत आहेत. अधिक माहितीसाठी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही.