ठाणे : ठाण्यात काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली होती. त्या मुलीचा रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी १७ वर्षीय मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. या मुलीचा चेंबुर येथील तिच्या मित्रासोबर वाद झाला होता. या वादातून त्या अल्पवयीन मुलाने जिवंत सोडणार नाही असे मुलीला धमकावले होते. याप्रकरणानंतर मुलगी घाबरली होती. २४ ऑक्टोबरला मुलगी तिच्या ठाण्यातील घरामध्ये एकटी असताना, त्या अल्पवयीन मुलाने संधी साधून त्या मुलीला पेटवले. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली होती. तिच्यावर मुंबईतील केईम रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी कापूरवाबडी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. परंतू, बुधवारी उपचारा दरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मुलीच्या मृत्यूनंतर १७ वर्षीय मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

नेमकी घटना काय ?

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. त्यावेळी तिची ओळख त्या भागात राहणाऱ्या एका मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली होती. त्यावेळी त्या मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच, तिच्या बचावासाठी ते गेले. त्यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिला जीवंत सोडणार नाही असे धमकावले होते. याप्रकानंतर मुलगी खूप घाबरली होती.

२४ ऑक्टोबरला मुलगी तिच्या ठाण्यातील घरामध्ये एकटी असताना अचानक त्यांच्या घरातून धूर येऊ लागला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला दिली. मुलीचे कुटुंबीय घरामध्ये आले असता, तिचा मित्र घरामध्ये होता. तर, मुलगी भाजलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या कुटुंबियांनी याचा जाब मुलाला विचारला असता, तो तेथून निघून गेला. अखेर मुलीच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले होते.