ठाणे : एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोनजणांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपुर्वी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास वर्ग होताच, ठाणे लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आणखी एकाला शुक्रवारी अटक केली आहे. त्याने तक्रारदार बांधकाम व्यवसायिकाकडून दहा लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले होते.
ठाण्यातील बेकायदा बांधकामाप्रकरणी महापालिकेतील अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी सुरु असतानाच, ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. पालिकेच्या वर्धापन दिनीच ही कारवाई झाली होती. जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाकडून त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर यांना पथकाने पकडले होते. याप्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे, महापालिकेत डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने ठाण्याच्या नौपाडा भागातील विष्णुनगर परिसरातील एका जमीन मालकाकडून जागा विकसित करण्यासाठी घेतली होती. या जागेमध्ये तीन बेकायदा दुकाने असून जागा मालकाने ही दुकाने हटविण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झाली नव्हती. जागा मालक ८७ वर्षांचे झाल्याने त्यांनी तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाला अधिकारपत्र दिले होते.
दरम्यान, बांधकाम व्यवसायिकाच्या मित्राने त्यांची ओळख सुशांत सुर्वे यांच्याशी करुन दिली होती. ते व्यवसायिकाला घेऊन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या दालनात घेऊन गेले. व्यवसायिकाने पाटोळे यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता, पाटोळे यांनी त्यांना कारवाई करण्यासाठी एका कागदावर २० लाख रुपये रक्कम लिहून पैशांची मागणी केली. तसेच पुढील प्रकरणाबाबत त्यांच्या एका सहकाऱ्याशी चर्चा करण्यास सांगितले. पाटोळे यांच्या सहकाऱ्याने २० लाखापैकी १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यात वळते करण्यास सांगितल्याने व्यवसायिकाने त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यात जमा केले होते. त्यामुळेच याप्रकरणात सुशांतवर गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.