ठाणे : समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी देत दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडे तब्बल २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. विविध माध्यमांमध्ये तसेच युट्युब चॅनेलवर खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याची धमकी दिली होती.
तक्रारदार दुय्यम निबंधक अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जानंतर ही कारवाई करण्यात आली. अजय पोपटलाल धोका ( ४६ , रा. भाईंदर), मनोज विजय मयेकर ( ५२ वर्षे, रा. भाईंदर पश्चिम) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, किरण मांजरेकर हा फरार आहे. या तिघांनी स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांच्या विरुद्ध वरिष्ठांकडे, विविध माध्यमांमध्ये तसेच युट्युब चॅनेलवर खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याची धमकी दिली होती. ही बदनामी टाळायची असेल तर २५ लाख रुपये द्यावे, अशी मागणी तिघांकडून करण्यात येत होती.
या तक्रारीनंतर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी खंडणीविरोधी पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत पारसिक नगर, कळवा येथील साई पूजा रेस्टॉरंटमध्ये सापळा रचला. तक्रारदारांकडून २० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच आरोपी अजय पोपटलाल धोका (४६) याला पथकाने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मनोज विजय मयेकर (५२) याला मिरा-भाईंदर परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपींना १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू असून ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या पथकाने केली.
