ठाणे – अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या परिसरांतील काही मोजक्या महिला बचत गटांनी यंदाच्या दिवाळीत स्वावलंबनाचा संदेश देत आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगली आर्थिक उलाढाल साधली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गटांनी स्वतः बनवलेला पारंपरिक फराळ, आकर्षक भेटवस्तू आणि हस्तकला वस्तू विक्रीसाठी सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या स्टॉल्समधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सुमारे एक आठवड्याच्या कालावधीत एकूण चार लाख रुपयांची विक्री झाली.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात बचत गटांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार बचत गट कार्यरत असून सुमारे १ लाख महिला यांच्याशी जोडल्या आहेत. यातील अनेक महिला वैयक्तिक स्तरावर विविध उत्पादनांची विक्री करतात. तर यंदा काही महिला बचत गटांना काही सार्वजनिक ठिकाणी विक्री साठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासन आणि महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील काही बचत गटांनी आठवडी बाजार, शासकीय कार्यालयांचे आवार, तसेच गर्दीचे चौक, मोठी मंदिरे अशा ठिकाणी स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सवर घरगुती चवीचा फराळ जसे की लाडू, चकल्या, करंज्या, शेव, शंकरपाळे, अनारसे यांसोबतच सुगंधी दिवे, रांगोळी साहित्य, आकर्षक भेटवस्तू आणि हस्तकला वस्तू नागरिकांसाठी विक्रीस ठेवण्यात आल्या. दिवाळीचा आनंद वाढवणारा हा उपक्रम पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

अंबरनाथ तालुक्यातील महिला बचत गटातील सविता पाटील यांनी सांगितले की, “आम्ही वर्षभर बचत गटाच्या माध्यमातून थोडेथोडे पैसे साठवतो, पण या वेळेस फराळ स्वतः तयार करून थेट ग्राहकांना विकल्याने आत्मविश्वास प्रचंड वाढला. लोकांनी घरगुती चवीला आणि आमच्या मेहनतीला दिलेला प्रतिसाद पाहून आनंद झाला.” कल्याण आणि मुरबाड परिसरातील महिलांनीही या उपक्रमातून चांगली कमाई केल्याचे सांगितले. काही गटांनी ऑनलाइन ऑर्डरही घेतल्यामुळे विक्रीचा आकडा अधिक वाढला. या उपक्रमासाठी स्थानिक ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि नगरपरिषदांनी सक्रिय सहकार्य केले. महिलांना स्टॉल लावण्यासाठी जागा, टेबल-खुर्च्या, तसेच पोस्टर आणि प्रचार साहित्याची सोय करून देण्यात आली. महिला बालविकास विभागाने उत्पादन गुणवत्ता, पॅकेजिंग आणि विक्री कौशल्य याबाबत प्रशिक्षणही दिले होते. त्यामुळे उत्पादन आकर्षक आणि ग्राहकाभिमुख बनले.

या मोहिमेत एकूण पाच तालुक्यांतील काही निवडक बचत गट सहभागी झाले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार, फराळ विक्रीतून सुमारे चार लाख रुपये तर भेटवस्तू आणि हस्तकला वस्तूंच्या विक्रीतून अंदाजे दीड लाख रुपये इतकी उलाढाल झाली. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या आर्थिक उत्पन्नाचे दार खुले झाले असून, त्यांच्या आत्मनिर्भरतेचा दीप अधिक उजळला आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “मोठ्या ब्रँडच्या वस्तूंना पर्याय म्हणून घरगुती बनवलेला फराळ घेतल्याचा समाधान वेगळंच असतं.

जिल्ह्यात सध्या नदीसाठी घातक असलेल्या जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. तर या जलपर्णीतुन विविध शोभेच्या आणि उपयोगी वस्तू बनविण्यात येत आहेत. याच जलपर्णी पासून बनविलेल्या परड्यांचा वापर फराळ विक्री करण्यासाठी करण्यात आला. अनेकांनी या परड्यांमध्ये फराळाच्या विविध गोष्टी टाकून भेटवस्तू स्वरूपात तयार करून घेतले. आणि याची उत्तम विक्री झाली.

तालुका निहाय विक्री

कल्याण – १ लाख ५४ हजार ३८५

मुरबाड – ५६ हजार २८०

शहापूर – ७८ हजार ४९०

अंबरनाथ – ७७ हजार २७५

भिवंडी – ३५ हजार ५८०