Thane Cadbury Junction Accident : ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ही दुर्घटना रविवार, १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.५९ वाजता कॅडबरी जंक्शनजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा ( MH ०३ DS ३०३६ ) नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जात होती. हि रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकर ( MH ०४ CU ७७२८ ) वर जाऊन जोरात आदळली. या धडकेत रिक्षामधील तीन प्रवासी वाहनाच्या आत अडकले. या प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या मार्गांवरून जाणारे वाहन चालक मदतीसाठी धावून आले होते. मात्र, तिघेजण.रिक्षात अडकल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

या घटनेची माहिती नागरिकांकडून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. यानंतर अपघातस्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे एक फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर रिक्षामध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

जखमींपैकी डॅनियल नाईक (५६) यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, आलम शेख (२९) यांना डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तिसरा प्रवासी बबलू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याचा मृत्यू झाल्याचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परिसरातील नागरिकांनीही येथे मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. रिक्षा आणि टँकर चालकांविषयी माहिती अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास ठाणे पोलीस करीत आहेत. हा अपघात उशीरा रात्री झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेली तत्पर कार्यवाही महत्वाची ठरली आहे.