ठाणे : स्वमालकीचे धरण नसल्यामुळे इतर स्त्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्याचबरोबर या टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नावर आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी आक्रमक भुमिका घेत थेट पालिका प्रशासनाला इशारे देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणी प्रश्न आता केवळ नागरिकांचा प्रश्न न राहता निवडणुकीतील मुख्य राजकीय अजेंडा ठरत चालला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्या तुलनेत शहरात होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. शहरात आजही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. याशिवाय, बेकायदा इमारतीही मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. एका इमारतीत शंभर ते दोनशे कुटुंबे राहण्यासाठी येतात. त्या तुलनेत मात्र पाणी पुरवठ्यात वाढ होत नाही. परिणामी, पालिका क्षेत्रात टंचाईची समस्या जाणवते. नव्याने वसलेले घोडबंदर, दिवा, कळवा, मुंब्रा या भागात टंचाईची समस्या अधिक जाणवते. या नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. निवडणुकीच्या काळात या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रश्नावर आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी आक्रमक भुमिका घेत थेट पालिका प्रशासनाला इशारे देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणी प्रश्न आता केवळ नागरिकांचा प्रश्न न राहता निवडणुकीतील मुख्य राजकीय अजेंडा ठरत चालला आहे.

वाढीव पाण्याची गरज

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेची मागणी मान्य केली पण, केवळ ५ दशलक्षलीटर इतकेच वाढीव पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आजही शहरात ४५ दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज आहे.

कोणत्या भागाला किती पाणी पुरवठा होतो

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत होता. मुंबई महापालिकेने दिलेल्या वाढीव पाण्यामुळे आता याठिकाणी १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. मात्र, तोही पुरेसा नाही. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलीटर, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलीटर असा एकूण ५९० दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो. असे असले तरी शहराला अजूनही वाढीव पाण्याची गरज आहे.

शिवसेनेची कोंडी

ठाणे महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेची गेले अनेक वर्षे सत्ता राहिली आहे. पालिकेत आता प्रशासकीय राजवट लागू आहे. नगरविकास विभागाच्या अख्यारित पालिकेचा कारभार सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचे खाते आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कळवा भागातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढत स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यातच आव्हाड यांनीही नागरिकांसोबत पालिका मुख्यालयात जाऊन आंदोलनाचा इशारा देत पाणी टंचाईसाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप आमदार संजय केळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाणी पळवापळवी सुरू असल्याचा आरोपही केला होता. यामुळे पाणी टंचाई हा निवडणुकीतील मुख्य राजकीय अजेंडा असण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.