ठाणे : कळवा येथील खारेगाव परिसरात नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबई विभागा मार्फत बुधवारी गॅस टँकरवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० लाख ०१ हजार ५१६ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई विभागाचे चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी) गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखालील फिरत्या पथकाने केली.
फिरत्या पथकाने बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कळवा खारेगाव परिसरात अचानक छापा टाकला असता, टॅंकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा प्रकार उघडकिस आला. या कारवाईत पथकाने दोन गॅसने भरलेले टॅंकर, २८ भरलेले व्यावसायिक सिलेंडर आणि ३० रिकामे व्यावसायिक सिलेंडर असा एकूण ५० लाख ०१ हजार ५१६ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, टॅंकरचे चालक आणि मालक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत फिरत्या पथकातील शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, दिपेंद्र परूळेकर, राजेश सोरते, अमोल बुरटे, विकास नागदिवे, देवानंद थोरवे, रविंद्र राठोड, अरुण काते आणि राहुल इंगळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच परिमंडळाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, ठाणे ४१ फ कार्यालयातील शिधावाटप अधिकारी सुभाष डूंबरे, महेश कुसमुडे आणि संतोष गुरव यांनीही या कारवाईत सहकार्य केले. या मोठ्या कारवाईत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई विभागाचे मार्गदर्शन लाभले. चंद्रकांत डांगे यांनी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
