ठाणे – यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने सहकार वर्ष जाहिर केले असून त्यानिमित्त ठाणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्यावतीने ‘सहकारातून समृद्धी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात स्वयंपूर्ण विकास, गृहनिर्माण व्यवस्थापन, सहकार कायदा आणि डिम्ड कन्व्हेयन्स यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तालुकास्तरावर चर्चासत्र होणार आहेत. तसेच ठाण्यातील विविध महाविद्यालयात सहकार कायद्यावर कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने ‘सहकारातुन समृद्धी’ ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षभर विविध ज्ञान प्रबोधनाचे कार्यक्रम राबविले जाणार आहे. यामध्ये यंदा पहिल्यांदाच ठाण्यातील महाविद्यालयात सहकार कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये सहकार कायदा, त्यातील तरतुदी, रोजच्या व्यवहारात उपयोग, सहकार शिक्षण, प्रशिक्षण या विषयांबाबत सहकार क्षेत्रातील विविध तज्ज्ञ, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, गृहनिर्माण संस्थांना आणि सोसायटीतील सभासदांच्या समस्या या विषयांवर मार्गदर्शन आणि उपाययोजना मिळाव्या, यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘दाद – फिर्याद’ हा जनसंवाद कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम गृहनिर्माण संस्थेच्या सभागृहात पार पडणार असून या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांचे सभासद, पदाधिकारी यांना समस्येविषयी समुपदेशन करून उपाय दिला जाणार आहे.

तालुक्यात चर्चासत्रांचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्वयंपुर्नविकास, गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन आणि मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, विविध कारणांमुळे रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपूर्णविकास या विषयी समस्या आणि स्वयंपूर्नविकासासाठी अर्थसाह्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. स्वयंपुर्नविकासासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थाचे पदाधिकारी याविषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाविषयी गृहनिर्माण संस्थेचे संचालक आणि मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक नागरिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

ठाणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्या वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या ठाण्यातील शिवाजी पथ येथील विलासिनी इमारतीमधील कार्यालयात अथवा thanedisthsgfed75@gmail.com या ई मेलवर नोंदणी किंवा तक्रारीची आगाऊ नोंद करता येणार आहे.