मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोडपटले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला कडाडून विरोध केला जातोय. या सर्व घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे म्हस्के यांनी आपल्या ट्विटमध्ये जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> ‘प्रिय शिवसैनिकांनो’ म्हणत एकनाथ शिंदेंचा नवा संदेश, म्हणाले “हा लढा…”

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षातील हा पहिलाच राजीनामा आहे. नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपद सोडल्यामुळे शिवसेनेसाठी हा पहिला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ही घोषणा म्हस्के यांनी ट्वीटद्वारे केली असून त्यांनी “भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा..
जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच. पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र,” असे म्हटले आहे.

हेही वाचा >> “हिंदुत्व शब्द लिहिता येतो का?” गुलाबराव पाटील, भुमरे ते संजय शिरसाट; संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य

दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीचे काही ठिकाणी समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक संदेश जारी केला असून आपला लढा हा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे,” असे शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district shiv sena president naresh mhaske given resignation in support of eknath shinde prd
First published on: 26-06-2022 at 00:17 IST