ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुर्व भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटिस) या बहुचर्चित प्रकल्पाचे काम पुर्ण करून तो वर्षाअखेरीस खुला करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या प्रकल्पातील उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले असून स्थानक परिसरातील डेकचे काम सुरू आहे. ही कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण करून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजन आखण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सॅटीस प्रकल्पाची यापुर्वीच उभारणी करण्यात आली आहे. त्याचधर्तीवर ठाणे पुर्व स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्पाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामाचा कार्यादेश पालिकेने २०१९ मध्ये ठेकेदार कंपनीला दिला. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतर प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालये तसेच इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला होता. तसेच या प्रकल्पाच्या आराखड्यांमध्ये करण्यात आलेले बदल आणि त्यांच्या मंजुरीसाठी झालेली दिरंगाई, परवानगी अभावी कोपरी पुलालगत या प्रकल्पाच्या जोडणीसाठी सहा ओव्हरहेड वायरचे खांब स्थलांतरणाचे रखडलेले काम, यामुळे हा पुल ठरवून दिलेल्या वेळेत पुर्ण होऊ शकला नव्हता. मात्र, रेल्वे विभागाकडून गेल्या वर्षभरात परवानगी मिळताच या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.

सहा ओव्हरहेड वायरचे खांब स्थलांतरण करण्याबरोबरच रेल्वे रुळावरील पुलाच्या जोडणीचे कामही नुकतेच पुर्ण झाले आहे. या पुलावरील मार्गिकेची उर्वरित अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ही कामे ऑक्टोंबरअखेर पुर्ण करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तसेच स्थानक परिसरात डेक उभारून त्याला पुल जोडण्यात येणार आहे. त्याचेही कामे वेगाने सुरू आहे. याठिकाणी रेल्वेची इमारत उभारणीचेही काम सुरू आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता धनंजय मोदे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकल्पाचे काम ८० टक्के पुर्ण झाले असून उर्वरित २० टक्के कामे पुर्ण करून हा पुल वर्षाअखेरीस खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्प आहे असा

या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग. यात १२ मीटर रुंद मार्गिका. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात ‘स्टेशन बिल्डिंग’चाही समावेश असेल. डेकच्या तळघरात दुचाकी व चारचाकींसाठी वाहनतळ. प्रकल्पाची एकूण किंमत २६० कोटी रुपये आहे.

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील पुला जोडणीचे काम पुर्ण झाले असून यावरील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे ऑक्टोबर अखेर तर, पुलाला जोडणाऱ्या डेकचे काम पुर्ण करून हा पुल वर्षाअखेरीस म्हणजेच, डिसेंबरपर्यंत खुला करण्याचे नियोजन आखण्यात आलेले आहे. – संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका