अंबरनाथ : बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या मुसळधार पावसाने अंबरनाथ शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचले. कल्याण-बदलापूर राज्य मार्गावरील विमको नाका, लादी नाका आणि चिखलोली या भागांमध्ये सुमारे एक फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहने संथ गतीने चालत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी गटारच नाही त्यामुळे पावसाळ्यात सातत्याने हा मार्ग पाण्याखाली जातो.

कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याचे काम रखडण्याची विविध शहरांमध्ये वेगवेगळी कारणे आहेत. उल्हासनगर काही ठिकाणी अतिक्रमणांमुळे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अंबरनाथ शहरात अशाच काही प्रश्नांमुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यात अंबरनाथ पश्चिम येथील सर्व पावसाचे पाणी नाल्यामार्गे या रस्त्यांवर येऊन थांबते. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले नाले अरुंद असल्याने पावसाचे सर्व पाणी मुख्य रस्त्यावर येते. त्यामुळे अंबरनाथ मध्ये विविध चौकांमध्ये एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचत असते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाणी साचण्याचे प्रकार होत आहेत.

बुधवारी रात्री सातच्या सुमारास अंबरनाथ मध्ये काही मिनिटांच्या पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य मार्ग पुन्हा पाण्याखाली गेला. मार्गावर विमको नाका, लादी नाका, चिखलोली परिसर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नाले आणि रस्ते यातील फरक कळत नसल्याने वाहतूक मंदावली होती. लादी नाका परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक भाजी विक्रेते उभे असतात. या सर्वांची पावसाच्या पाण्यामुळे धावा धाव झाली. चिखलोली परिसरात जांभूळ नाका ते थेट बदलापूर शहराचे प्रवेशद्वार या भागात बदलापूरच्या मार्गिकेवर रस्त्याच्या कडेला नालेच नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. वाहन चालक दुभाजकाच्या कडेने कसेबसे वाहन काढत होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.